वार्ताहर / देवरुख
संगमेश्वर तालुक्यातील कनकाडी येथे अमित पंडित यांच्या काजूच्या बागेत पॅमेलियन जातीचा दुर्मीळ सरडा आढळून आला आहे. सोमवारी पंडित हे त्याच्या काजूच्या बागेत गेले असता, पॅमेलियन जातीचा हा अत्यंत दुर्मिळ सरडा झाडाच्या फांदीवर दिसून आला. हा सरडा अत्यंत दुर्मिळ समजला जातो.
आफ्रिकेत आढळणारा सरडा आपल्याकडे क्वचित दिसून येतो. साधारण सहा इंच लांब असलेला हा सरडा प्रामुख्याने झाडावर आढळून येतो. रंग बदलण्यात माहिर म्हणून हा सरडा ओळखला जातो. विशेष करुन हिरव्या रंगामध्ये हा सरडा आढळून येतो. ज्या झाडावर हा सरडा असतो, त्या झाडाच्या पानांच्या रंगाप्रमाणे तो आपल्या रंगाची छटा बदलतो. त्यामुळे तो सहजासहजी आपल्याला दिसून येत नाही. या सरडय़ाच्या गळ्य़ावर आणि पोटावर पांढऱया काटय़ांची ओळ दिसून येते.
पॅमेलियन सरडाबद्दल लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. हा सरडा विषारी आहे, प्राण्यांना चावला तर प्राणी मरतो, माणसाच्या डोक्याला चावतो, असे समज असले तरी हे सगळे चुकीचे असल्याचे पंडित यांनी सांगितले. हा सरडा पूर्णतः बिनविषारी असुन तो स्वसंरक्षणार्थ हल्ला करतो. शत्रुपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी तो आपल्या रंगांची छटा बदलत असतो.