वृत्तसंस्था/ युफा (रशिया)
कनिष्ठांच्या विश्व कुस्ती स्पर्धेत भारताच्या महिला मल्ल संजू देवी आणि भातेरी यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे भारताच्या सानेहचे शुक्रवारी कास्यपदकासाठीच्या प्ले ऑफ लढतीतील आव्हान संपुष्टात आले. या स्पर्धेत भारतीय महिला मल्लानी तीन रौप्य आणि दोन कास्य अशी एकूण पाच पदकांची कमाई केली. स्पर्धेच्या गुणतक्त्यात भारताने 134 गुणांसह तिसरे स्थान मिळविले.
या स्पर्धेमध्ये भारतीय मल्लांना सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. महिलांच्या 62 किलो वजन गटातील अंतिम लढतीत रशियाच्या ऍलीना केसाबाएव्हाने तांत्रिक सरसतेवर सुवर्णपदक पटकाविले. या लढतीत रशियन मल्ल केसाबाएव्हाने संजु देवीच्या पाय पकडत पूर्ण पकडीत दोन गुण मिळविले. संजू देवीला केसाबाएव्हाच्या पकडीतून आपली सुटका करून घेता न आल्याने तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
65 किलो वजन गटातील झालेल्या सुवर्णपदकाच्या लढतीत माल्डोव्हाच्या इटिना रिंगेसीनने भारताच्या भातेरीचा तांत्रिक गुणांवर पराभव करत सुवर्णपदक मिळविले. भातेरीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या लढतीत बचावत्मक धोरणामुळे भातेरीचे सुवर्णपदक हुकले. 72 किलो वजन गटातील कास्यपदकाच्या लढतीत भारताच्या सानेहच्या गुडघ्याला दुखापत झाल्याने तिचे पदक हुकले.
या स्पर्धेत गुरूवारी भारताच्या बिपाशाने रौप्यपदक तर सिमरनने 50 किलो वजन गटात तसेच सिटोने 55 किलो वजन गटात कांस्यपदके मिळविली. या स्पर्धेत अमेरिकेने सर्वंकष जेतेपद पटकाविताना 143 गुण मिळविले. रशिया आणि भारत यांनी या स्पर्धेत समान 134 गुण मिळविले असले तरी रशियाने दोन सुवर्णपदकांची कमाई केल्याने त्यांना दुसरे तर भारताला तिसरे स्थान मिळाले. पुरूषांच्या ग्रीको रोमन पद्धतीच्या विभागात शुक्रवारी भारताच्या विविध वजन गटातील मल्लांना उपांत्य फेरी गाठता आली नाही.