वृत्तसंस्था/ कोविलपट्टी (तामीळनाडू)
रविवारी येथे झालेल्या हॉकी इंडियाच्या 12 व्या कनिष्ठ पुरूषांच्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेचे अजिंक्यपद उत्तरप्रदेशने पटकाविले. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात उत्तरप्रदेशने चंदीगडचा पराभव केला.
या स्पर्धेतील अंतिम सामना चुरशीचा झाला. सामन्याच्या पूर्वार्धात उत्तरप्रदेश संघातर्फे सौरभ खुशवाहने चौथ्या मिनिटात तर कर्णधार शारदानंद तिवारीने 33 व्या मिनिटाला गोल नोंदविले. चंदीगडने या सामन्यात शेवटपर्यंत खाते उघडले नाही. त्यामुळे उत्तरप्रदेशने हा सामना 2-0 असा जिंकून अजिंक्यपद पटकाविले. या स्पर्धेतील तिसऱया आणि चौथ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात हरियाणाने ओडिशाचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. या विजयामुळे हरियाणाने या स्पर्धेत तिसरे स्थान मिळविले.