वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
लॉटेरे डोमेनीने नोंदवलेल्या हॅट्ट्रिकच्या बळावर अर्जेन्टिनाने सहावेळचे चॅम्पियन्स जर्मनीला 4-2 असा पराभवाचा धक्का देत कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेचे जेतेपद पटकावले. दुसऱयांदा त्यांनी ही स्पर्धा जिंकली आहे. जर्मनीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
डोमेनीने तीनही गोल पेनल्टी कॉर्नरवर 10, 25 व 50 व्या मिनिटाला नोंदवले. प्रँको ऍगोस्टीने शेवटच्या मिनिटाचे काही सेकंद असताना संघाचा चौथा मैदानी गोल केला. ज्युलियस हेनर (36 वे मिनिट) व मास फँडट (47) यांनी जर्मनीचे दोन गोल नोंदवले. अर्जेन्टिनाने यापूर्वी 2005 मध्ये रॉटरडॅम येथे झालेल्या स्पर्धेचे जेतेपद मिळविताना अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाचा 2-1 असा पराभव केला होता. सामन्याच्या पहिल्या सत्रात अर्जेन्टिनाचा खेळ जर्मनीपेक्षा सरस झाला. जर्मनीच्या बचावफळीवर त्यांनी वारंवार दडपण आणत वर्चस्व गाजविले. जर्मनीने नेहमीप्रमाणे प्रतिआक्रमणाच्या संधीची प्रतीक्षा केली. पण त्यांचा डावपेच त्यांच्याच अंगलट आल्याचे स्पष्ट झाले. दहाव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर डोमेनीने गोल नोंदवून अर्जेन्टिनाला आघाडी मिळवून दिली. 25 मिनिटाला त्यानेच ही आघाडी पेनल्टी कॉर्नरवर वाढविली. मध्यंतरानंतर जर्मनीने मात्र सुधारित खेळ केला आणि 36 व्या मिनिटाला मैदानी गोल नोंदवून अर्जेन्टिनाची आघाडी कमी केली. हेनरने हा गोल नोंदवला. शेवटची 15 मिनिटे असताना जर्मनीने आक्रमण तेज केले आणि 47 व्या मिनिटाला 2-2 अशी बरोबरी साधली. पण 50 व्या मिनिटाला डोमेनीने आणखी एक गोल नोंदवत अर्जेन्टाला आघाडी मिळवून दिली आणि शेवटच्या क्षणांत ऍगास्टिनीने मैदानी गोल करीत जर्मनीचे आव्हान संपुष्टात आणले.