उत्तर प्रदेशातील कनौज येथील सुगंध तथा सुरस विकास केंद्र नामक संस्थेने एक नव्या स्वादाचा चहा तयार केला आहे. हा चहा आसामच्या जगप्रसिद्ध चहापेक्षाही अधिक स्वादिष्ट आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविणारा असल्याचा दावा करण्यात येत आहे. ज्यांनी याची चव चाखली आहे ते या दाव्याशी सहमत आहेत, असेही सांगण्यात येते. या चहाचे नाव ‘स्पाईसी लेमन ड्रिंक मिक्स’ असे ठेवण्यात आले आहे. मात्र, तो नेहमीच्या चहासारखा नसून त्यापेक्षा भिन्न प्रकारचा आहे. या चहाची भुकटी पाऊचमध्ये उपलब्ध होणार असून अनेक प्रसिद्ध कंपन्यांबरोबर त्याच्या मार्केटिंगसाठी चर्चा अंतिम फेरीत आहे. या भुकटीमध्ये लवंग, मिरी, जिरे, लिंबू, वेलदोडे, दालचिनी, काळे मीठ, आले, गवती चहा, इत्यादींचे मिश्रण आहे. तुळशीच्या बियांचे तेल या भुकटीचा स्वाद वाढविण्यास साहाय्यभूत ठरले आहे. खोकला, ताप, सर्दी इत्यादी विकारांवर या चहाचा उत्कृष्ट उपयोग होतो, असे चाचण्यांमध्ये दिसून आले आहे. तुळशीच्या तेलामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो, असाही दावा करण्यात आला आहे. या भुकटीचे सूत्र बनविण्यासाठी अनेक महिने प्रयोग करण्यात आले असून आहारतज्ञ शिवम शुक्ला यांचे यात मोठे योगदान आहे. लवकरच आपला दिवस या आयुर्वेदिक चहापासून सुरू होण्याची शक्मयता आहे, असे या विकास केंद्राचे म्हणणे आहे.
Previous Articleभारतीय पबजीकरीता पूर्वनोंदणी 18 मेपासून
Next Article दुसरी लाट ओसरण्याची चिन्हे
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.