प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव शिक्षण खात्याच्या निवृत्त अधिकारी राजेश्वरी एस. हेगडे यांना चेतन फौंडेशन हुबळी यांच्याकडून देण्यात येणारा मानाचा कन्नडती राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 10 ऑक्टोबर रोजी धारवाड येथे दसरोत्सवानिमित्त झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी गदग जिल्हा पंचायतीच्या उपाध्यक्षा डॉ. शोभा बसवराज मेटी, कन्नड विकास प्राधिकरण जागृती समिती धारवाडचे एच. एस. किरण, रंगायण धारवाडचे संचालक रमेश परविनायकर, चेतन फौंडेशनचे चंद्रशेखर माडलगेरी, चिन्नई पाटील उपस्थित होते. 1982 पासून 2018 पर्यंत तब्बल 35 वर्षे 7 महिने शिक्षण क्षेत्रातील विविध ठिकाणी राजेश्वरी हेगडे यांनी उत्कृष्ट सेवा बजाविली आहे. याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. राजेश्वरी हेगडे या मूळच्या कारवार जिल्हय़ाच्या कुमठा तालुक्यातील मुरुरु येथील आहेत. प्रारंभी त्या कारवार जिल्हा उपसचिव कार्यालयात रुजू झाल्या. त्यानंतर 1991 मध्ये बेळगाव जिल्हा उपनिर्देशक कार्यालय, खानापूर गटशिक्षणाधिकारी कार्यालयात सेवा बजावली. शिक्षिका म्हणून सेवा बजावण्याबरोबरच राजेश्वरी यांना कविता लिहण्याचा छंद होता. दरम्यान, विविध संघ-संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.