बिहारमध्ये राजकीय वातावरण तापले-लोजप खासदार नितीश यांच्या भेटीला
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारच्या राजकारणात दोन भेटींनी हालचाली वाढविल्या आहेत. लोकजनशक्ती पक्षात बंडखोरीचे सूर उमटू लागले आहेत. लोजप खासदार चंदन सिंग यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली आहे. तर भाकप नेते आणि जेएनयू विद्यार्थी संघाचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमारनेही नितीश यांचे सहकारी मंत्री अशोक चौधरी यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजप तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कन्हैया मोठा विरोधक मानला जातो. तर भाकपमध्येही कन्हैयाला विरोध सुरू झाला आहे.
कन्हैयाने संजद नेते आणि राज्याचे मंत्री अशोक चौधरी यांची भेट घेतली आहे. या भेटीला औपचारिक संबोधिण्यात आले असले तरीही यामुळे राजकीय खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीत डाव्या पक्षांच्या उत्तम कामगिरीनंतर भाकपच्या नेत्याशी नितीश यांच्या सहकाऱयाशी झालेली चर्चा महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
कन्हैयाच्या विरोधात त्याच्याच पक्षाने निंदा प्रस्ताव संमत केला आहे. पक्षाचे अनेक नेते त्याच्या विरोधात आहेत. तर बिहार विधानसभा निवडणुकीनंतर सुरू असेलल्या पक्षांतराच्या या काळात या भेटीला महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे. संजद अन्य पक्षांच्या नेत्यांना स्वतःसोबत आणण्याचा प्रयत्न करत आहे. राज्याच्या सरकारमध्ये भाजपचं पारड जड झालं आहे.
लोजपचे नवादा येथील खासदार चंदन कुमार यांनी मुख्यमंत्री नितीश यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. पक्षाध्यक्ष चिराग पासवान यांनी नितीश यांच्या विरोधात घेतलेली भूमिका पाहता चंदन यांनी घेतलेली भेट लक्ष वेधून घेणारी ठरली आहे.