सर्व तलावांची स्वच्छता : रंगरंगोटीसह दिव्यांची सोय करण्याची कामे सुरू, दहाव्यादिवशी होणार सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन
प्रतिनिधी /बेळगाव
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विसर्जन तलावांची स्वच्छता करून रंगरंगोटी केली जाते. आठपैकी बहुतांश तलावांच्या स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले आहे. कपिलतीर्थ तलावातील पाणी काढून गाळ व कचरा काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून तलावाभोवती सुशोभिकरण करण्यात येत आहे.
पाच दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्याची सूचना राज्य शासनाने केली होती. त्यामुळे विसर्जन तलाव सज्ज ठेवण्यासाठी तलाव स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले होते. कपिलेश्वर मंदिरासमोर असलेल्या जुन्या कपिलेश्वर तलावाच्या स्वच्छतेचे काम पूर्ण करून पाच दिवसांच्या गणपती विसर्जनासाठी सज्ज ठेवण्यात आला आहे. पण दहा दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्याची मागणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी केली. त्यामुळे दहा दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे दहाव्यादिवशी सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे.
शहर आणि उपनगरांतील सार्वजनिक आणि घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी महापालिकेने आठ ठिकाणी विसर्जन तलावांची सुविधा उपलब्ध केली आहे. या सर्व तलावांची स्वच्छता, रंगरंगोटी आणि दिव्यांची सोय उपलब्ध करण्याची कामे सुरू आहेत. सर्व कामे पूर्ण करून विसर्जनासाठी सज्ज करण्यात येणार आहे. सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनासाठी कपिलेश्वर मंदिरासमोर असलेला तलाव अपुरा पडत होता. यामुळे याठिकाणी मंदिराच्या शेजारी नवीन तलाव निर्माण करण्यात आला आहे. या तलावाच्या स्वच्छतेचे काम सुरू करण्यात आले आहे. तलावातील पाणी काढण्यासाठी पंप लावण्यात आले होते. पाणी काढून स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.