वारंवार खोदाईमुळे रस्ता पूर्ण खराब : वाहनधारकांना ये-जा करणे झाले कठीण : त्वरित दुरुस्त करण्याची रहिवासी, व्यावसायिकांची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
शहरात विविध भागात अमृत योजनेंतर्गत डेनेज वाहिन्या घालण्याचे काम पूर्ण झाले आहे. या डेनेज वाहिन्या मुख्य वाहिन्यांना जोडण्याचे काम सुरू करण्यासाठी एसपीएम रोडपासून जुन्या धारवाड रोडला जोडणाऱया कपिलेश्वर कॉलनीतील रस्त्यावर खोदाईचे काम करण्यात आले होते. हा रस्ता खराब झाला असून रस्त्यावरून ये-जा करणे अडचणीचे बनले आहे. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
एसपीएमरोड ते जुना धारवाडरोड दरम्यानच्या कपिलेश्वर कॉलनीतील रस्त्यावर डेनेज वाहिन्या घालण्याचे काम सुरू करण्यात आले होते. अमृत योजनेंतर्गत डेनेज वाहिन्या घालण्याचे काम हाती घेण्यात आल्यामुळे रस्त्याची खोदाई करण्यात आली होती. यापूर्वी दोन ते तीनवेळा या रस्त्याची खोदाई करण्यात आली होती.
संपूर्ण रस्त्यावर खड्डय़ांचे साम्राज्य
वारंवार खोदाईमुळे रस्ता पूर्ण खराब झाला असून वाहनधारकांना ये-जा करताना नाहक त्रास सहन करावा लागतो. संपूर्ण रस्त्यावर खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सातत्याने रस्ता खोदाई करण्यात आल्याने रस्ता कधी व्यवस्थित होणार का? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
एसपीएम रोड ते जुना धारवाड रोडला जाण्यासाठी हा रस्ता सोयीचा आहे. त्यामुळे रस्त्यावरून वाहनांची वर्दळ मोठय़ाप्रमाणात असते. तसेच अवजड वाहनांची गर्दी कायम असते. अशातच या रस्त्यावर शाळा व उद्यान असल्याने विद्यार्थी ये-जा करीत असतात. विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱया वाहनांची गर्दी होत असते. पण रस्ता खराब असल्याने वाहनधारक आणि नागरिकांना नाहक त्रास होत आहे. गेल्या दोन वर्षांपासून रस्त्यावर सातत्याने खोदाई करण्यात येत असल्याने व्यावसायिक, रहिवासी आणि पालक हैराण झाले आहेत. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करून रस्ता वाहनधारकांना खुला करावा, अशी मागणी रहिवासी, व्यावसायिक व वाहनधारकांतून होत आहे.