प्रतिनिधी/ बेळगाव
दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त शुक्रवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 25 हजारांहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी मंदिर ट्रस्टच्यावतीने ठिकठिकाणी महिला व पुरुषांसाठी सोय केली होती. यामुळे भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेणे सोयीचे झाले.
दक्षिणकाशी म्हणून ओळख असलेल्या कपिलेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त गुरुवार व शुक्रवार असे दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी पहाटेपासूनच महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत मंदिर परिसर भाविकांनी गजबजला होता.
शुक्रवारी सकाळपासूनच महाप्रसादासाठी लगबग सुरू होती. प्रतिवर्षाप्रमाणे यावषीही महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. कपिलेश्वरांची आरती झाल्यानंतर महाप्रसाद सुरू झाला. सायंकाळी 4 वाजेपर्यंत महाप्रसादाचे वाटप सुरू होते.