प्रतिनिधी / शिरोळ
जांभळी येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय निमंत्रित व्यावसायिक डॉ.सा.रे. पाटील चषक कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी मुंबई पोलीस विरुद्ध भारत पेट्रोलियम यांच्यात चुरशीचा सामना झाला. भारत पेट्रोलियम संघाचा खेळाडू काशीलिंग आडके, अक्षय सोनी यांच्या उत्कृष्ट चढाईमुळे मुंबई पोलीस संघावर 15 गुणांनी विजय मिळवला. तर अतिशय रोमहर्षक सामन्यात मुंबई बंदर संघाने एयर इंडिया संघावर स्मिथिल पाटील यांच्या खोलवर चढाईमुळे 10 गुणांनी विजय मिळवला.
जांभळी येथील जांभळी क्रीडा मंडळाच्या रौप्यमहोत्सवी निमित्त स्वर्गीय डॉ.सा.रे.पाटील क्रीडानगरीत राज्यस्तरीय व्यावसायिक निमंत्रित कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी प्रकाझोतात सामने क्रीडारसिकाना पाहायला मिळाले.या स्पर्धा पाहण्यासाठी जिल्हा व परिसरातील कबड्डीप्रेमींनी मोठया संख्येने हजेरी लावली.विशेषतः मंडळाने महिलांसाठी बैठक व्यवस्था स्वतंत्र करण्यात आली होती.
दुसऱ्या दिवशी ठाणे महानगरपालिका विरुद्ध टीबीएम रायगड यांच्यात सामना झाला.यामध्ये ठाणे महानगरपालिका संघाने एकतर्फी विजय मिळवला.दुसऱ्या सामन्यात इन्कमटॅक्स विरुद्ध बँक ऑफ बडोदा यांच्यात झालेल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात निलेश साळुंखे व तुषार पाटील यांच्या ऊकृष्ट चढाईमुळे ७ गुणांनी इन्कमटॅक्स पुणे संघाने निसटता विजय मिळवला. रात्री उशिरापर्यंत सामने सुरू होते. बुधवारी बाद फेरीला प्रारंभ होणार आहे.
राष्ट्रीय पंच अण्णासाहेब गावडे,दिनेश चव्हाण, रुपेश जाधव,आशिष मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली अनेकांनी पंच म्हणून काम पाहिले. कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी गणपतराव पाटील अण्णासाहेब पाटील ,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे,दरगु गावडे, सुनील शेळके, अंजूम मेस्त्री, पंडित काळे, अशोक कोळेकर, अमरसिंह निकम, शिवाजीराव माने देशमुख, सदाशिव पोकळकर,प्रमोद पाटील,बाबासो पाटील,पै युवराज पाटील,सरदार सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रो कबड्डी खेळाडूंचे वर्चस्व
नेहमीच मॅटवर खेळणारे प्रो कबड्डी खेळाडू मातीवरील कबड्डी मैदानात चमकले. आणि क्रीडारसिकांची दाद घेतली. काशीलिंग आडके,निलेश शिंदे,तुषार पाटील,निलेश साळुंखे, परेश म्हात्रे, नितीन मोरे, राजवीर चव्हाण,शुभम शिंदे आदी प्रो कबड्डी खेळाडूंनी आपल्या संघाच्या विजयासाठी दमदार कामगिरी केली.