वार्ताहर / कबनूर
कबनूर येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार चौकापासून जवळच असलेल्या एका कंपनीचा टॉवर श्रद्धा ड्रेसेस यांच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या मोबाईल टॉवरच्या केबिन रूमला अचानकपणे शॉर्टसर्किटमुळे आग लागली. धुराचे लोट पसरले होते. अग्निशामक दलाने त्वरित येऊन ही आग आटोक्यात आणली. यामुळे मोठा अनर्थ टळला.
इचलकरंजी ते कोल्हापूर रोडवरील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आयडिया व एअरटेल कंपनी चे एकत्रित मोबाईल टॉवर आहे. टॉवरची यंत्रणा चालू राहावे यासाठी जनरेटर व बॅकअप बॅटरी याची व्यवस्था बिल्डिंग वर केलेली आहे. या रूमला सायंकाळी पाचच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. नागरिकांना धुराचे लोट दिसताच सतर्क नागरिकांनी अग्निशामक दलाला फोन केला.
इचलकरंजी नगरपालिका व पंचगंगा साखर कारखाना चा अग्निशामक दलाच्या दोन गाड्या तत्परतेने घटनास्थळी आल्यामुळे ही आग आटोक्यात आणण्यात आली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अग्निशामक दलाची गाडी येण्यास थोडा वेळ झाला असता तर ही आग बॅटरी रूम मधून केबल वायरला लागून टॉवर पेटण्याची शक्यता होती. यामध्ये कंपनीचे मोठे नुकसान झाले दिसते. नुकसानीबाबत विचारणा केली असता ते सांगण्यास टाळाटाळ केली.