प्रतिनिधी/कोल्हापूर
कबनूर (ता. हातकणंगले) येथे वॉलपुट्टीचे काम करुन उतरत असताना उंचावरुन पडून गंभीर जखमी झालेल्या एका परप्रांतीय वॉलपुट्टी कामगाराचा उपचारादरम्यान सीपीआरमध्ये मृत्यु झाला. सोनकुमार जगदिश गौड (वय 20, सध्या रा. कलानगर, इचलकरंजी, मुळ रा. गोंविदपूर, चिलुयातालधान्य, पोस्ट गजतबेल्प, जि. गोरखपूर, उत्तरप्रदेश,) असे त्यांचे नाव आहे. या घटनेची नोंद पोलिसात झाली आहे.
मृत सोनकुमार गौड हा तरुण आपल्या सहकारी मित्राच्या बरोबर वॉलपुट्टीचे काम करण्यासाठी इचलकरंजीत आला होता. तो आणि त्याचे सहकारी कलानगर परिसरात भाडय़ाच्या घरात राहतात. गेल्या काही दिवसापासून कबनूर येथील अविनाश रमेश धोत्रे यांच्या घरात त्याला वॉलपुट्टीचे काम मिळाले. हे काम करत असताना सुमारे पाच फुट उंचीच्या लाकडी स्टुलावरुन त्याचा तोल गेल्याने तो स्टुलावरुन खाली पडला. यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यांच्या सहकाऱयांनी त्याला उपचारासाठी आयजीएम हॉस्पीटलमध्ये दाखल केले. पण उपचारादरम्यान त्यांचा मध्यरात्री सीपीआरमध्ये मृत्यु झाला. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलिसात झाली आहे.