अंगणवाडी सेविका भाजून गंभीर जखमी
इचलकरंजी / प्रतिनिधी
कबनूर (ता. हातकणंगले ) येथील दत्तनगर परिसरातील एका घरांमध्ये घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅसची गळती होऊन स्फोट झाला. या स्फोटात एक महिला भाजून गंभीर जखमी झाली. तर घराच्या भितींना तडे जावून छताचे अक्षरशः तुकडे झाले आहेत. हा स्फोट बुधवारी सकाळी 6.30 च्या सुमारास झाला आहे. या स्फोटाच्या आवाजाने या परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
कांचन संजय स्वामी असे गंभीर जखमी महिलेचे नाव आहे. त्या एकात्मिक बाल विकास प्रकल्प हातकणंगले प्रकल्प दोन मध्ये अंगणवाडी सेविका म्हणून काम करीत आहेत. त्यांना उपचारांसाठी त्वरित शहरातील आयजीएम रुग्णालयात दाखल केले. पण प्रकृती अधिकच गंभीर बनल्याने पुढील उपचाराकरीता त्यांना सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
कबनूर, दत्तनगरामधील अकरावी गल्लीतील सिद्राया नरसाप्पा अथणी यांच्या घरात भाड्याच्या घरात अंगणवाडी सेविका कुटूंबासह राहत आहेत. बुधवारी सकाळी 6.30 सुमारास त्यांच्या घरात घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅसची गळती होऊन स्फोट झाला. या स्फोटात त्या भाजून गंभीर जखमी झाल्या. घराचे छत उडून जावून छताचे अक्षरशः तुकडे झाले आहेत. या घराच्या परिसरात छताचे तुकडे विखरुन पडले आहेत. तर भितींना तडे गेले आहेत. या घटनेची माहिती समजताच शिवाजीनगर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.