जमात उल मुस्लामिन गौसिया सुन्नी ट्रस्टची मागणी
प्रतिनिधी / पणजी
सांतइनेज येथील कब्रस्तानमध्ये मस्जिद असल्याची मान्यता यापूर्वी देण्यात आलेली असताना पणजी मनपाने मशिदीची तात्पुरती शेड पाडली. मशिदीची मोडतोड करण्यापूर्वी जमात उल मुस्लामिन गौसिया सुन्नी ट्रस्टच्या मुस्लिम बांधवांना विश्वासात घेणे आवश्यक होते. नमाज पठणात मनपाने अटकाव केल्याबद्दल न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून आज याविषयी सुनावणी होणार आहे. सरकारने मुस्लिमांना याठिकाणी दिवसातून पाचवेळा नमाज पठणासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी ट्रस्टचे अध्यक्ष बाबनी शेख यांनी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली. यावेळी ट्रस्टचे रफिक जमादार व इतर सदस्य उपस्थित होते.
कब्रस्तानकडील ही तात्पुरती शेड आम्ही पैसे जमा करून बांधली होती. सदर शेड पाडण्यापूर्वी पणजी मनपाने त्यासंदर्भात पूर्वकल्पना देणे गरजेचे होते. 20 वर्षापूर्वी मशिदीकडील जागेबाबत समिती स्थापन करण्यात आली होती. या जागेच्या मालकाने ना हरकत दाखला ट्रस्ट व मनपा या दोघांच्या नावे दिला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मशिदीसंदर्भातील निर्णय आम्हाला विश्वासात घेऊन घ्यायचे. मनपाकडून नवीन कब्रस्तानमध्ये सुविधा असणे आवश्यक आहे. 20 वर्षाच्या काळात महापौर आले आयुक्त आले त्यावर काहीच आक्षेप आला नाही. आता पणजी मनपा काहीही ऐकण्याची स्थितीत नाही. सरकारने यावर लक्ष घालणे आवश्यक असल्याची मागणी शेख यांनी यावेळी करून त्याने माजी महापौर उदय मडकईकर यांच्यावर अनेक ताशेरे झोडले. पत्रकार परिषदेला असंख्य मुस्लीम बांधव उपस्थित होते.