बदल मागे घेण्याची मागणी, नगरसेवक महेश आमोणकर यांचा सहभाग, आठवडाभरात कृती न झाल्यास उपोषणाचा इशारा
प्रतिनिधी /मडगाव
सोनसडा येथे मुस्लिमांसाठी कब्रस्तान उभारण्याकरिता जागा देण्यात आली होती. मात्र आता त्या जागेचा झोन बदलला असल्याचे सांगण्यात येत आहे. सदर बदल मागे घेणे शक्मय असल्यास मुख्यमंत्री व नगरनियोजनमंत्र्यांनी तसे करून मुस्लिमधर्मियांना दिलासा द्यावा, अशी आठवडाभरापूर्वी मागणी करणारे मडगाव पालिकेचे नगरसेवक महेश आमोणकर यांनी मंगळवारी पालिकेसमोर मुस्लिमबांधवांना घेऊन निदर्शने केली.
यावेळी स्थानिक आमदार दिगंबर कामत यांच्यावर त्यांनी टीका केली. दक्षिण गोवा नियोजन व विकास प्राधिकरणाचे सदस्य असताना आमदार कामत यांना झोन बदलला जात असल्याची कल्पना नव्हती काय. त्यांनी या झोन बदलास विरोध का केला नाही, असे सवाल आमोणकर यांनी यावेळी उपस्थित केले. कामत यांनी नेहमीच मुस्लिमबांधवांचा वापर करून घेतला असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. आम्ही आठवडाभरात काही कृती न झाल्यास पालिकेसमोर उपोषणाला बसणार, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
आमदार कामत यांना मुस्लिमधर्मियांना कब्रस्तानसाठी जागा उपलब्ध व्हावी असे वाटत असल्यास त्यांनी आमच्यासह उपोषणास बसावे, असे आवाहन आमोणकर यांनी केले. यावेळी फलक घेऊन तसेच हाताला काळय़ा पट्टय़ा बांधून सरकारच्या झोन बदल करण्याच्या कृतीचा निषेध करण्यात आला. मध्यंतरी खारेबांद येथील आपल्या प्रभागात खारेले येथे सदर कब्रस्तान उभारण्यासाठी प्रयत्न सुरू झाले होते. त्यास आपला विरोध नव्हता. मुस्लिमबांधवांची कित्येक वर्षांची ही मागणी पडून असून ती पूर्ण व्हायला हवी. मात्र खारेले येथील जागेत कित्येक परप्रांतियांची घरे असून ती घरे नावावर करण्यासाठी बाबा नामक व्यक्तीने 2 ते 4 लाख रुपये कित्येकांकडून घेतले आहेत. ते परत करण्याची मागणी केल्यास आज-उद्या देण्याच्या आश्वासनाच्या पलीकडे काही होत नाही, असे आमोणकर म्हणाले.