ऑनलाईन टीम/तरुण भारत
युक्रेन आणि रशियातील तणाव दिवसेंदिवस वाढत असून आज युद्धाच्या चौथ्या दिवशीही हल्ले होत आहेत. अशा परिस्थितीत अमेरिकेने युक्रेनला पाठिंबा दिला आहे. तसेच युद्धात संयुक्त राष्ट्रांशी संबंधित २८ देशंनी युक्रेनला सामरिक मदत करण्याची घोषणा केली आहे. अनेक देशांच्या फौजा युक्रेनच्या मदतीसाठी निघाल्या देखील आहेत. या पार्श्वभूमीवर हे युद्ध अधिक व्यापक होत असताना आता जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेने गंभीर इशारा दिला आहे. तसेच अमेरिकेने रशियावर आर्थिक निर्बंध लादले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही रशियाला वारंवार इशारा दिला आहे. यावर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यांनी बायडेन यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
दरम्यान, रशिया युक्रेन वादावर अमेरिकेच्या भूमिकेविषयी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यावर निशाणा साधला आहे. “माझ्या कार्यकाळात युद्ध झालं नाही. मी आपल्याला युद्धातून बाहेर काढलं. कमकुवत राष्ट्राध्यक्षामुळे हे जग कायमच भितीच्या सावटाखाली असणार आहे. व्लादिमिर पुतीन हे जो बायडेन यांना एखाद्या ढोलसारखे वाजवत आहेत”, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत. “आपल्या निवडणुकांमध्ये घोटाळा झाला नसता, तर हे सगळं घडलंच नसतं. आणि जर मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असतो, तर हे अजिबात घडलं नसतं. हे फार स्पष्ट आहे. हे अजिबातच घडलं नसतं”, असं ट्रम्प म्हणाले आहेत.