नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सरकारी तेल कंपन्यांनी ऑगस्टपासून गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये मोठी वाढ केली आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने 19 किलो कमर्शिअल गॅसच्या किंमतीत 73.50 रुपये प्रतिसिलिंडरने वाढवले आहेत. या दरवाढीमुळे आता बहुतांश शहरांमध्ये 19 किलो सिलिंडरची किंमत 1,600 रुपयांच्या पुढे गेली आहे. ऑगस्टच्या प्रारंभीच कमर्शियल सिलिंडर दरात झालेल्या वाढीमुळे व्यावसायिक लोकांना महागाईचा झटका बसला असला तरी घरगुती सिलिंडरचे दर जैसे थे ठेवल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये घरगुती वापराचे 14.2 किलोच्या गॅस सिलिंडर किमतीमध्ये वाढ करण्यात आलेली नाही. घरगुती सिलिंडरची किंमत सध्या 840 रुपयांच्या आसपास आहे. जुलैमध्ये तेल कंपन्यांनी या सिलिंडरच्या किमतीत 25.50 रुपयांनी वाढ केली होती.
पेट्रोल-डिझेल दर जैसे थे
देशात सलग 15 दिवसांपासून पेट्रोलच्या आणि डिझेलच्या किंमती स्थिर आहेत. आजही त्यात कोणताही बदल झाला नाही. मुंबईत एक लिटर पेट्रोलची किंमत 107.83 रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत 97.45 रुपये प्रतिलिटर आहे. तर देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत 101.84 रुपये प्रतिलिटर आणि डिझेलची किंमत 89.87 रुपये प्रतिलिटर आहे. देशातील तेल कंपन्यांनी 17 जुलैनंतर डिझेलच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही. 17 जुलै रोजी पेट्रोलच्या दरात 29 ते 30 पैशांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर रविवारपर्यंत सलग पंधराव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. जुलै महिन्यात पेट्रोलच्या किमतीत 9 वेळा आणि डिझेलच्या किमतींमध्ये 5 वेळा वाढ झाली आहे. तसेच मे आणि जून महिन्यात इंधनाच्या किमतींमध्ये 16-16 वेळा वाढ झाली होती.