महागाईचा मार : दिल्लीत 2 हजार रुपयांहून अधिक झाली किंमत
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच एक मार्च रोजी 19 किलो वजनाचा कमर्शियल (वाणिज्यिक वापराचा) एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 105 रुपयांची वाढ झाली आहे. नव्या किमती मंगळवारपासूनच लागू झाल्या आहेत. 14.2 किलोग्रॅमच्या घरगुती अनुदानित सिलिंडरच्या किमतीत कुठलाच बदल करण्यात आलेला नाही.
दिल्लीत 19 किलाग्रॅमच्या कमर्शियल गॅस सिलिंडरची किंमत 105 रुपयांनी वाढून 2,012 रुपय झाली आहे. कोलकात्यात कमर्शियल सिलिंडरची किंमत 108 रुपये वाढून 2,095 रुपयांवर पोहोचली आहे. पूर्वी ही किंमत 1,987 रुपये इतकी होती. मुंबईत कमर्शियल सिलिंडरची किंमत 1,857 रुपये झाली आहे. चेन्नईत हीच किंमत 2,145 रुपये झाली आहे. मागील महिन्यात म्हणजेच एक फेब्रुवारी रोजी कमर्शियल सिलिंडरच्या किमतीत 91.50 रुपयांची कपात करण्यात आली होती.