घरगुती सिलिंडर दर मात्र स्थिर
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
व्यावसायिक (कमर्शियल) एलपीजी सिलिंडरच्या (19 किलो) किमती 1 जुलैपासून म्हणजेच शुक्रवारपासून 198 रुपयांनी कमी झाल्या आहेत. सुधारित दरानुसार राजधानी दिल्लीत आता 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 2,021 रुपये झाली आहे. पूर्वी हा दर 2,219 रुपये होता. जुलै महिन्याच्या प्रारंभीच व्यावसायिक सिलिंडर दरात कपात करण्यात आली असली तरी घरगुती सिलिंडरचे दर मात्र जैसे थे ठेवण्यात आले आहेत.
व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात झाल्याने रेस्टॉरंट्स, भोजनालये, चहाचे स्टॉल्स आणि इतरांना काहीसा दिलासा मिळणार आहे. यापूर्वी 1 जून रोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 135 रुपयांनी कपात करण्यात आली होती. गेल्या महिन्यात 1 जून रोजी दिल्लीत 19 किलो व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 2,219 रुपये होती. त्यापूर्वी मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात 19 किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. तसेच 1 मे रोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 102.50 रुपयांनी वाढून 2,355.50 रुपयांवर पोहोचली होती. एप्रिल आणि मार्चमध्ये देखील 19 किलो व्यावसायिक एलपीजीच्या किमती 250 रुपये आणि 105 रुपये प्रतिसिलिंडरने वाढल्या होत्या. देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी एलपीजी सिलिंडरचे दर प्रत्येक महिन्याच्या प्रारंभी निश्चित केले जातात.