घरगुती गॅस दरात कोणतीही वाढ नाही
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
इंधन कंपन्यांनी ऑक्टोबर महिन्यातील गॅसच्या किंमती जारी केल्या आहेत. त्यात कमर्शियल (व्यावसायिक) सिलिंडरची किंमत 32 रुपयांनी वाढवली आहे. मात्र, अनुदानित किंवा घरगुती सिलिंडरची (14.2 किलो) किंमत स्थिर राहिल्याने सामान्य माणसाला या दरवाढीची थेट झळ बसणार नाही. इंधन कंपन्यांनी केवळ व्यावसायिक कारणांसाठी वापरल्या जाणाऱया सिलिंडरची किंमत वाढवली आहे. घरगुती वापरासाठी वापरला जाणारा 14.2 किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलिंडरची किंमत सध्या 594 ते 603 रुपयांच्या दरम्यान आहे. तर व्यावसायिक कारणासाठी वापरल्या जाणाऱया 19 किलोग्रॅमच्या सिलिंडरची किंमत 1,150 ते 1,250 रुपयांच्या दरम्यान आहे. आता ऑक्टोबर महिन्यात त्यात वाढ झाली आहे. देशातील वेगवेगळय़ा शहरांनुसार या गॅस सिलिंडरसाठी वेगवेगळी किंमत आकारली जात असते.