घरगुती एलपीजीचे दर मात्र स्थिर – गृहिणींना दिलासा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सप्टेंबर महिन्यातील मोठय़ा दरवाढीनंतर सलग दुसऱया महिन्यात कमर्शियल (व्यावसायिक) सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी ऑक्टोबर महिन्याच्या प्रारंभीच व्यावसायिक लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस अर्थात एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 43.50 रुपयांची वाढ केली आहे. हे नवीन दर शुक्रवारपासूनच लागू झाले आहेत. व्यावसायिक सिलिंडरचे दर वाढले असले तरी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरांमध्ये कोणताही बदल झाला नसल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे. नव्या दरवाढीमुळे विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमती 900 रुपयांच्या आसपास स्थिर राहिल्या आहेत. मात्र, 19 किलोच्या व्यावसायिक प्रतिसिलिंडरची किंमत आता 1,736.50 रुपये (दिल्लीतील दर) इतकी झाली आहे.
मागील महिन्यात 1 सप्टेंबर रोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 75 रुपयांची तर घरगुती सिलिंडरच्या किमती 25 रुपयांनी वाढवण्यात आल्या होत्या. आता पुन्हा महिन्याभरातच व्यावसायिक सिलिंडर दर 43.50 रुपयांनी महाग करण्यात आला. व्यावसायिक गॅस सिलिंडरचा वापर हा प्रामुख्याने हॉटेल्स, ढाबे आणि सार्वजनिक भोजनालयांमध्ये अधिक होत असल्यामुळे नजिकच्या काळात हॉटेलमधील पदार्थ महाग होऊ शकतात.
31 डिसेंबर 2020 पर्यंत व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1,332 रुपये इतकी होती. त्यानंतर अवघ्या 9 महिन्यात झालेल्या वाढीनंतर हा दर आता 1,736.50 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच केवळ 9 महिन्यात 400 रुपयांनी दर वाढला आहे. तसेच 1 जानेवारी ते 1 सप्टेंबरदरम्यान घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत 190 रुपयांची वाढ झाली आहे.
दर महिन्याच्या पहिल्या दिवशी, सर्व सरकारी तेल कंपन्या गॅस सिलिंडरच्या किंमती कमी करायच्या, वाढवायच्या की नाही हे ठरवतात. गेले काही महिने सातत्याने एलपीजीच्या दरात वाढ केली जात आहे. सरकारने दरमहा दर वाढवून एलपीजीवरील सबसिडी काढून टाकली. या मासिक वाढीमुळे मे 2020 पासून सबसिडी काढून टाकल्यामुळे आता ग्राहकांच्या बँकखात्यातही अनुदानाचे पैसे जमा होत नसल्यामुळे सिलिंडरसाठी पूर्ण किंमत मोजावी लागत आहे.