प्रतिनिधी / फोंडा
दिवंगत ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक कमलाकांत पुंडलीक धामस्कर यांना स्वातंत्र्यसैनिक संघटना गोवातर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. संघटनेचे खजिनदार औदुंबर शिंक्रे एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातू धामस्कर यांना श्रद्धांजली वाहताना गोवा मुक्तीलढय़ात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे म्हटले आहे.
कमलाकांत धामस्कर हे मूळ केरी फोंडा येथील असून गोमंतकीय स्वातंत्र्य लढय़ात त्यांनी भूमिगत कार्य केले आहे. मार्क फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रही तुकडीने पत्रादेवी येथे केलेल्या सत्याग्रहात त्यांचा सहभाग होता. यावेळी धामस्कर यांना अटक करून साधारण दीड वर्ष तुरुंगात डांबण्यात आले होते. सुटकेनंतरही त्यांनी आपले भूमीगत कार्य सुरुच ठेवले होते. त्यानंतर गोवा लिबरेशन आर्मीचे प्रमुख आवगुस्टस आल्वारीस यांच्या गटात 1956 पर्यंत ते कार्यरत होते. 1974 मध्ये केंद्र सरकारने ताम्रपत्र देऊन धामस्कर यांचा सत्कार केला होता. गोवा सरकारतर्फेही त्यांना सन्मान करण्यात आले होते.