ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी शुक्रवारी 1 तास 25 मिनिटे देशाच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा पदभार स्विकारला. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन शुक्रवारी वॉल्टर रीड नॅशनल मिलिटरी मेडिकल सेंटरमध्ये कोलोनोस्कोपीसाठी गेले होते. त्यावेळी हॅरिस यांना देशाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली.
व्हाईट हाऊसचे प्रेस सचिव जेन साकी म्हणाले की, कोलोनोस्कोपीच्या वेळी बायडेन भूलीच्या प्रभावाखाली असतील, म्हणून त्यांनी थोडय़ा काळासाठी हॅरिस यांच्याकडे सत्ता सोपवली. हॅरिस यांनी 1 तास 25 मिनिटे राष्ट्राध्यक्ष म्हणून प्रथमच काम केले. सत्तेच्या तात्पुरत्या हस्तांतरणाची घोषणा करणारी अधिकृत पत्रे शुक्रवारी सकाळी 10:10 वाजता पाठवली गेली. त्यानंतर हॅरिस आणि व्हाईट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ रॉन क्लेन यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर बायडेन यांनी सकाळी 11:35 वाजता आपली कर्तव्ये पुन्हा सुरू केली.