ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी डेमोक्रेटिक पक्षाकडून भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हॅरिस या कॅलिफोर्नियाच्या खासदार आहेत. कॅलिफोर्नियाच्या ॲटर्नी जनरल म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. राष्ट्राध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाकडून डोनाल्ड ट्रम्प तर डेमोक्रेटिक पक्षाकडून जो बायडेन रिंगणात आहेत. बायडेन यांनीच त्यांच्या पक्षाकडून हॅरिस यांची उपराष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून निवड केली आहे.
उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या हॅरिस पहिल्या कृष्णवर्णीय महिला असणार आहेत. कृष्णवर्णीयांची मते मिळवण्याच्या दृष्टीने बायडेन यांनी हा निर्णय घेतला आहे. हॅरिस या निर्भीड आणि देशाच्या उत्तम सेवक आहेत. त्यामुळे मी सन्मानाने हॅरिस यांचे नाव उपराष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून जाहीर करत आहे. आम्ही दोघे मिळून या निवडणुकीत ट्रम्प यांचा पराभव करू, असे बायडेन यांनी म्हटले आहे.
हॅरिस या मूळ भारतीय आहेत. त्या भारतीय-जमैकन वंशाच्या आहेत. त्यांची आई तामिळ आहे.