प्रतिनिधी / फलटण :
सुरवडी ता. फलटण येथील टाटा कमिन्स कंपनीच्या वेअर हाऊस व अँसेम्बली विभागामध्ये ठिकठिकाणी ठेवलेले 1 कोटी 60 लाख 57 हजार 35 रुपये किंमतीचे इंधन इंजेक्टर अज्ञातांनी चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 1 एप्रिल 2019 ते दि.4 ऑक्टोबर 2019 या कालावधीमध्ये अज्ञात चोरटय़ाने टाटा कमिन्स प्रायव्हेट लिमिटेड, सुरवडी, ता. फलटण, जि. सातारा या कंपनीमधील वेअर हाऊस व अँसेम्बली विभागामध्ये ठिकठिकाणी ठेवलेले 1 कोटी 60 लाख 57 हजार 35 रुपये किंमतीचे इंधन इंजेक्टर चोरुन नेले आहेत. यामध्ये 1) बॉश कंपनीचे, 5295060 या मॉडेलचे 1032 नग, 2) कमिन्स 4384619 या मॉडेलचे 628 नग, 3) कमिन्स 4384786 या मॉडेलचे 586 नग, 4) बॉश कंपनीचे 5306050 या मॉडेलचे 325 नग असे एकूण 2557 इंधन इंजेक्टर चोरीस गेले आहेत.