वृत्तसंस्था/ ढाका
लंकेचा क्रिकेट संघ सध्या बांगलादेशमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. या कसोटी मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या 18 सदस्यांच्या लंकन संघामध्ये फलंदाज कमिल मिशाराचा समावेश करण्यात आला होता. या दौऱयात मिशाराकडून बेशिस्त वर्तन घडल्याने लंकन क्रिकेट मंडळाने त्याला तातडीने मायदेशी येण्याचा आदेश दिला आहे.
या दौऱयासाठी दाखल झालेल्या लंकन संघाची राहण्याची व्यवस्था एका हॉटेलमध्ये करण्यात आली होती. या हॉटेलच्या रुममध्ये राहणाऱया लंकन संघातील कमिल मिशाराने आपल्या खोलीमध्ये एका पाहुण्यासमवेत करमणूक करत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आले. दरम्यान क्रिकेटपटूंसाठी बंधनकारक असलेल्या शिस्तपालन नियमाचा मिशाराकडून भंग झाल्याने त्याच्यावर लंकन क्रिकेट मंडळाने कारवाई करत मायदेशी परतण्याचा आदेश बजावला आहे. 21 वर्षीय कमिल मिशाराने आतापर्यंत या वर्षात तीन टी-20 सामन्यात लंकेचे प्रतिनिधीत्व केले असून त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नाही.