सुदीप ताम्हणकर यांचा आरोप
प्रतिनिधी/ पणजी
वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांना डिजिटल टॅक्सी मीटर बसवण्याचे कमिशन मिळत असावे म्हणून ते मीटर सक्ती करतात, वाहतूक संचालक अशिक्षितप्रमाणे वागतात, असा आरोप बस मालक संघटनेचे अध्यक्ष सुदीप ताम्हणकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला व ऍप बेज्ड मीटरचा पर्यायावर सरकारने विचार करावा अन्यथा परत आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
आझाद मैदानावर झालेल्या या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, दि. 19 जुलै 2021 रोजी बस मालक संघटनेने वाहतूक संचालकांना पत्र लिहून मागण्या सादर केल्या होत्या. त्यात डिजिटल मीटर रद्द करुन ऍपबेज्ड मोबाईलवरील मीटरचा पर्यायावर विचार करण्याची मागणी केली होती. मेघा, मेरु, ओला, उबेर या टॅक्सी सेवा अशाच ऍपबेज्ड टॅक्सी मीटर चालवतात. त्याचप्रमाणे गोव्यातही सुविधा द्यावी आणि 11 हजार रुपयांचा डिजिटल मीटर बसवण्यात येऊ नये. सरकारचे तेवढे पैसे वाचतील असे ते म्हणाले. या व्यवहारात कमिशन खाण्यासाठी वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो सदर मीटर सक्ती करीत असल्याचे ते म्हणाले.
दि. 19 जुलै रोजी लिहिलेल्या पत्रात मांडण्यात आलेल्या मागण्यावर चर्चा करण्यासाठी सरकारने बैठक बोलावयला हवी होती पण वाहतूक संचालक सदर पत्र फेटाळताना त्यावर शेरा मारतात व बस मालक संघटनेला टॅक्सी मालकांच्या प्रश्नात पडण्याचा काय अधिकार आहे, असा प्रश्न करतात हे वाहतूक संचालक बहुतेक अडाणी असायला हवे, असे ताम्हणकर म्हणाले. बस मालक संघटनेतील किमान 70 बस मालकांकडे टॅक्सी आहेत व हा त्यांचाही प्रश्न असल्याने बस मालक संघटना त्यांच्या मदतीला धांवली आहे. मुंबई उच्च न्यायालयानेही टॅक्सी प्रश्नी बस मालक संघटनेची बाजू ऐकून घेतली आणि वाहतूक संचालक मात्र त्याकडे दुर्लक्ष करतात. डिजिटल मीटर ऐवजी ऍपबेज्ड मोबाईल करणे शक्य आहे की नाही हा प्रश्न उच्च न्यायालयाने सरकारकडे सोपवला आहे पण सरकारच ऐकायला तयार नाही. या सरकारला फक्त आंदोलनाचीच भाषा कळत असेल तर आंदोलन परत एकदा छेडले जाईल, असे त्यांनी सांगितले.