ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यामुळे सर्व क्षेत्रात चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे.
केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डानं (सीबीडीटी) इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै होती.
कोविडच्या साथीमुळे निर्माण होणारे अडथळे आणि करदात्यांना अधिक सुलभतेने पालन करता यावे यासाठी सिबिडीटीने 2018-19 (असेसमेंट इयर 2019-20) या आर्थिक वर्षांसाठी इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची तारीख 31 जुलै वरून वाढवून 30 सप्टेंबर केली आहे. आयकर विभागानं यासंदर्भात ट्विट करुन ही माहिती दिली आहे.
नवे आणि रिवाईज्ड इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख तिसऱ्यांदा वाढवण्यात आली आहे.सर्वात पहिल्यांदा रिटर्न दाखल करण्याची तारीख 31 मार्च होती. त्यानंतर ती वाढवून 30 जून करण्यात आली. त्यानंतर पुन्हा एकदा ती मुदत वाढवून 31 जुलै केली होती आणि आता पुन्हा वाढवून ती 30 सप्टेंबर करण्यात आली आहे.