प्रतिनिधी /काणकोण
मडगाव-कारवार मार्गावरील करमल घाटावरील एका धोकादायक वळणावर 22 रोजी पहाटे 5.30 च्या दरम्यान एक वाहन बंद पडल्यामुळे या मार्गावरील वाहतूक जवळजवळ पाच तास खोळंबली. चालू हंगामात अशी पहिलीच घटना या भागात घडली आहे.
मडगाव येथून कारवारला जाणाऱया या वाहनांपैकी एक वाहन दुसऱया वाहनाला बाजू देत असताना पावसामुळे भुसभुशीत झालेल्या मातीमुळे रस्त्याच्या मधोमधच बंद पडले. त्यामुळे या मार्गावरील कारवारच्या दिशेने येणारी सर्व वाहने परत फिरवून बाळ्ळी, खणगिणी, बेतूल, खोल, आगेंदमार्गे चार रस्ता या बाजूने, तर मडगावच्या दिशेने जाणारी सर्व वाहने चार रस्ता, आगोंदमार्गे बेतूल, चिंचोणे अशी वळविण्यात आली. दोन्ही मार्गांवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी सतत पडत असलेल्या पावसाचा मारा सोसत कुंकळ्ळी तसेच काणकोणच्या पोलिसांनी महत्त्वपूर्ण अशी कामगिरी बजावली. पहाटे हा अपघात घडल्यामुळे दूधवाहक वाहने, वर्तमानपत्रांची वाहने पोहोचायला बराच उशीर झाला. त्याचप्रमाणे काणकोणातील सरकारी, निमसरकारी कार्यालये, बँका, विमा कार्यालयात मडगावहून येणाऱया कर्मचाऱयांची बरीच गैरसोय झाली.