प्रतिनिधी / करमाळा
ऊसाचा ट्रॅक्टर खाली करून परत जाणाऱ्या चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात ट्रॅक्टर चालक जागीच ठार झाला आहे. हा अपघात आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास जामखेड-करमाळा रस्त्यावर पोथरे येथील राजोपाध्येयांच्या पेट्रोलपंपाजवळ घडला आहे. यात मिळालेल्या माहितीनूसार पोफळज येथील राजेंद्र उत्तम पवार (वय-४६) हे हाळगाव येथील साखर कारखान्यात ऊस टाकून रिकाम्या ट्रॉल्या घेऊन करमाळाकडे भरधाव वेगात येत असताना सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टरची रस्त्याच्या खाली पलटी झाली.
त्यात ट्रॅक्टरखाली सापडून चालक राजेंद्र पवार यांचे जागीच निधन झाले आहे. पवार हे पोफळजचे माजी सरपंच मारूती उत्तम पवार यांचे बंधू आहेत. त्यांच्या मागे पत्नी, वडील व भाऊ असा परिवार आहे. यात करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक पवार हे करत आहेत.