प्रतिनिधी / करमाळा
करमाळा शहर व तालुक्यात कोरोना रुग्णाकडून लाखो रुपये उकळले जातात अशा तक्रारी येत असतात, अशाच एका तक्रारींमध्ये शिवसेनेने लक्ष घातल्यानंतर तात्काळ संबंधित हॉस्पिटलने बिलामध्ये तीस हजार रुपये कमी केले मात्र या रकमेवर शिवसेना समाधानी नसून याबाबत तहसीलदार समीर माने यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.
अर्जुन भीमराव रोकडे राहणार फिसरे तालुका करमाळा केएमजी कोवीर सेंटर करमाळा येथे उपचार घेत होते, त्यांना ऑक्सिजन लावण्यात आला होता ,ऑक्सिजन बेड म्हणून एक लाख 37 हजार ,पाचशे रुपये बिल देण्यात आले .शिवाय मेडिकल चे औषधांचे पैसे वेगळे घेण्यात आले. ऑक्सीजन फक्त तीन ते चार दिवस लावण्यात आला होता हे बिल प्रमाणापेक्षा जास्त होत असल्यामुळे संबंधित रुग्णाचे नातेवाईक हनुमान रोकडे यांनी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्याकडे तक्रार केली.
चिवटे यांनी तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष तपास सहाय्यक निबंधक दिलीप तिजोरी यांच्याकडे भ्रमणध्वनीवरून तक्रार केली तहसीलदार समीर माने यांना याबद्दल माहिती दिली.
बिलाची रक्कम दिल्याशिवाय संबंधित हॉस्पिटल रुग्णाला सोडत नसल्यामुळे वाद वाढू लागला यावेळी हे प्रकरण आता शिवसेनेने मार्फत तहसीलदारांकडे जाणार हे लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी तडजोडीची भूमिका घेऊन एक लाख दहा हजार रुपये घेऊन पेशंटला सोडून दिले यामध्ये एका सहकारी साखर कारखान्याच्या शेतकी अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.
याबाबत बोलताना चिवटे म्हणाले की ऑक्सिजन बेडला प्रतिदिन चार हजार रुपये खर्च द्यावा असे शासनाचा आदेश आहे या चार हजार रुपयांमध्ये एक्स-रे रक्ताच्या चाचण्या डॉक्टर विजिट नर्स स्वच्छता या सर्व सेवा समाविष्ट आहेत . डॉक्टर अधिकृत बिल देत नाहीत, मेडिकल दुकानदार अधिकृत बिल देत नाहीत. एक लाख दहा हजार रुपये घेऊन सुद्धा बिल दिलेले नाही, एखाद्या रुग्णाला विमा मिळवायचा असेल तर बिला ची गरज असते. तरी या बिलाची पूर्ण तपासणी करून उर्वरित रक्कम रुग्णाला द्यावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे. व या रुग्णाला अधिकृत रूग्णालयाचे बिल व मेडिकल चे बिल द्यावे.
याबाबत बोलताना हनुमंत रोकडे म्हणाले की एक लाख 37 हजार 500 रुपये बिल दिल्यानंतर आम्ही अधिकृत बिलाची मागणी केली ते बिल आम्हाला डॉक्टरांनी दिले नाही .एका कागदावर फक्त आकडा लिहून दिला. शिवाय बिल न दिल्यास रुग्णाला सोडणार नाही, अशी भूमिका डॉक्टरांनी घेतली. यामुळे आम्ही शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्याकडे तक्रार केली पेशंट घरी जायची घाई करत असल्यामुळे आम्ही नाईलाजाने एक लाख दहा हजार रुपये देऊन पेशंट घरी घेऊन गेलो, पण ही रक्कम जास्त असून संबंधित बिलाचे ऑडिट करून उर्वरित रक्कम त्या रुग्णाला परत द्यावी अशी आमची मागणी आहे.