तरुण भारत संवाद प्रतिनिधी /करमाळा
करमाळा तालुक्यातील सोमवारी दुपारी 5 च्या सुमारास पाच ठिकाणी घरफोड्या झाल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या घटनांचा तातङीने तपास हाती घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. वीट, विहाळ, भोसे येथे आदी ठिकाणी घरफोडीचे प्रकार घडले आहेत.
घरफोडी झालेले तक्रार देण्यासाठी सोमवारी सायंकाळी पोलिस स्टेशनला गेले असता फिर्याद देण्यासाठी संबंधितांना आज बोलवण्यात आले आहे. तर घरफोडीचा तपास तात्काळ व्हावा, अशी मागणी संतोष दिनकर ढेरे यांनी केली आहे. वीट येथील भैरवनाथनगरमधील प्रकाश दिनकर ढेरे, संतोष दिनकर ढेरे या दोन्ही भावाची घरे फोडली आहेत. येथे घर फोडून लहान मुलांची कंबरेची चांदीची चैन व कानातील सोन्याचे कुडके चोरीला गेली आहेत. तर विहाळ येथील बाळासाहेब काशीनाथ बंडगर यांचे गावातील घर दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान कुलूप तोडून घरातील चोरी करत असताना कशाचा आवाज येत आहे, म्हणून शेजारील एका महिलेने पाहिले असता दुचाकीवर दोन तरुण तोंडाला काळे बांधलेले दिसून आले. यावेळी या महिलेने संबंधितांना विचारले असता आम्ही पाहुणे आहोत, असे म्हणून त्यांनी पळ काढला. तर भोसे येथील सुरवसे वस्तीवरील बापू यशवंत सुरवसे यांच्या घराचे कुलूप व दारवाजा तोडून 15 हजार रुपये व पाच ग्रॅम सोने व चांदीचे पैंजण चोरी केले आहे. या गावातील सुदाम यादव सुरवसे यांच्या घराचे कुलूप व दार तोडले, कपाट फोडले आहे. तालुक्यात भर दिवसा घरफोड्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तपास कामी सूत्रे हाती घ्यावीत, अशी मागणी केली जात आहे.