माजी आमदार नारायण पाटील यांनी दिला उपोषणास पाठींबा
प्रतिनिधी / करमाळा
करमाळा तालुक्यात सुरू असलेले अवैध धंदे बंद करून सर्व पोलीस अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करण्याबाबत भाजपातर्फे सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस असून या उपोषणास आज माजी आमदार नारायण पाटील व पंचायत समिती सभापती गहिणीनाथ ननवरे यांनी निवेदनाव्दारे पाठींबा दर्शविला आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे. की करमाळा तालुक्यामध्ये मटका, जुगार, गुटखा, वाळू, चक्री, मावा, बनावट दारू, हातभट्टी तसेच बेकायदेशीर लॉजींग, वेश्या व्यवसाय आदी प्रकारचे बेकायदेशीर अवैध धंदे जोरात सुरू आहेत. या अवैध धंद्यास करमाळा पोलीस कार्यालयाचे पोलीस अधिकारी खतपाणी घालत असून कोट्यावधीची माया गोळा करत आहेत. तसेच सर्वसामान्य जनतेस पोलीस कार्यालयाकडून लज्जास्पद, अपमानास्पद वागणूक देऊन धमकीवजा भाषा वापरली जात आहे. आर्थिक मायापोटी परस्परांवर खोटे गुन्हे दाखल केले व जातात. या बाबीला आळा बसण्यासाठी तसेच अवैधधंदे बंद करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे गणेश चिवटे व त्यांच्या कार्यकत्यारनी 6 नोव्हेंबर पासून तहसील कार्यालय येथे आमरण उपोषण सुरू केले आहे.
या उपोषणास आमचा जाहीर पाठींबा असून तात्काळ संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी होऊन त्यांचेवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी; अशीही मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली.