ढोल-ताशा वादनाबरोबर मर्दानी खेळ, महिलांची बुलेट रॅली ठरली लक्षवेधी
कोल्हापूर प्रतिनिधी
करवीर गर्जना ढोल ताशा पथकाच्या वतीने गुढी पाडव्याचे औचित्य साधून शहरात शनिवारी काढण्यात आलेल्या शोभायात्रेला उदंड प्रतिसाद लाभला. करवीर गर्जनाच्या कलाकारांनी सादर केलेल्या ढोल-ताशा वादनाबरोबरच मर्दानी खेळ, महिलांची बुलेट रॅली आणि विविध वेषभूषेतील बालचमू यांनी शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. या शोभायात्रेच्या माध्यमातून कोरोनाच्या संकटकाळात आपला जीव धोक्यात घालू सेवा बजावणाऱया कोविडयोद्धय़ांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
मिरजकर तिकटी येथे शनिवारी सकाळी 9 च्या सुमारास शोभायात्रेला सुरूवात झाली. तेथून बिनखांबी गण्sाश मंदिर, महाव्दार रोड, गुजरी, भाऊसिंगजी रोडवरून भवानी मंडप येथे शोभायात्रेचा समारोप झाला. जोश आणि जल्लोषात झालेल्या या शोभायात्रेत दोनशेहून अधिक कलाकार सहभागी झाले होते. 120 ढोल आणि 30 ताशे वाजविणाऱया कलाकारांनी अक्षरशः वातावरण बदलून टाकले. नटून-थटून उत्साहाने बुलेट रॅलीत सहभागी झालेल्या युवती देखील आकर्षण ठरल्या. मर्दानी खेळांच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे केले. विविध प्रकारच्या वेशभूषा केलेला बालचमू तर उपस्थितांच्या कौतुकाचा विषय ठरला. शोभायात्रेत करवीर निवासिनी अंबाबाई आणि युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. ढोल-ताशाच्या दणदणाटात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात मार्गस्थ झालेल्या या शोभायात्रेने जणू करवीर नगरी दुमदुमून गेली. युवराज जोशी, आशय बागल, विक्रमसिंह घोरपडे, प्रसाद सावंत, भक्ती परब, श्रेया जोशी, निखिल गावडे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी या शोभायात्रेचे नियोजन केले.
शोभायात्रेचा सोहळा कॅमेऱ्यात कैद
हौशी युवा छायाचित्रकारांची संस्था असणाऱ्या कोल्हापूर फोटोग्राफर्स कम्युनिटीतील वीरेन शिरगावकर, पार्थ वणकुद्रे, केदार जोशी, ज्ञानेश महाजन, आदित्य ऐनापुरे, प्रज्वल चौगुले, नितीन पाटील, संकेत साळी, ऐश्वर्या खाडे यांनी करवीर गर्जनेच्या या शोभायात्रेची छायाचित्रे काढत सोशल मीडियावर पोस्ट केली. या संस्थेच्या वतीने दर रविवारी स्ट्रीट फोटोग्राफीचा उपक्रम राबविला जातो.