स्वप्न स्टडीजचा उपक्रम – विचारवंत सुभान अली करणार शिवविचारांचा जागर
प्रतिनिधी/ सातारा
‘स्वप्न स्टडीज’ या ऑनलाईन क्लासेसतर्फे देशात एक अभूतपूर्व असा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. कराचीत स्थाईक झालेले गायकवाड, भोसले, दुपटे, राजपूत, जगताप, अटकेकर अशा मराठी लोकांना मराठी शिकवण्याचा आगळा वेगळा उपक्रम सुरु आहे. आता आणखी एक नवा उपक्रम यावर्षी साजरा होत असून कराचीत दि. 19 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ऑनलाईन साजरी होणार आहे. अशी माहिती स्वप्न स्टडीज चे संचालक स्वप्नील पुराणिक यांनी दिली.
शिवजयंती दिनी महाराष्ट्रातील थोर मुस्लिम विचारवंत शेख सुभान अली जे महाराष्ट्र दंगल मुक्त अभियानाचे अध्यक्ष असून धर्मनिरपेक्ष समाज निर्माण करण्यासाठी जे सतत प्रयत्नशील असतात. ते पाकिस्तानमधील मराठी बांधवांना छत्रपती शिवरायांचा इतिहास ऑनलाईन पद्धतीने सांगणार आहेत.
दि. 19 रोजी आपण महाराष्ट्रात शिवजयंती साजरी करत असलो तरी पाकिस्तानमध्ये या कार्यक्रमाला दि. 21 रोजी परवानगी देण्यात आली आहे. ऑनलाईन पद्धतीने हा कार्यक्रम होणार आहे. पाकिस्तानमधील मराठी नागरिक पहिल्यांदाच शिवरायांचा इतिहास ऐकणार आहेत.
या कार्यक्रमाची पाकिस्तानमधील मराठी कुटुंबामध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या कार्यक्रमाला छत्रपती शिवरायांचे तेरावे वेशज खासदार छत्रपती उदयनराजे भोसले उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातील ज्या शिवप्रेमींना या कार्यक्रमात सहभागी व्हायचे असेल आणि आमच्या या उपक्रमात भाग ध्यायचा असेल त्यांनी स्वप्न स्टडीजच्या फेसबुक पेजला भेट द्यावी किंवा 7620921098 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.