कराची शेअरबाजारावर दहशतवादी हल्ला
कराची / वृत्तसंस्था
पाकिस्तानातील कराची शहरातील शेअरबाजाराच्या इमारतीवर सोमवारी भीषण दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात 11 जण ठार झाले असून चार दहशतवाद्यांचाही त्यांच्यात समावेश आहे, असे अनुमान आहे. सकाळी साडेअकरा वाजता ही घटना घडली. चौकशीचा आदेश देण्यात आला आहे.
या हल्ल्याची जबाबदारी बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (बीएलए) स्वीकारली आहे. दहशतवादी कार कारने इमारतीजवळ आले. त्यांनी प्रथम इमारतीच्या आत हातगोळे फेकले. त्यानंतर त्यांनी इमारतीत प्रवेश करून मशिनगन्सच्या साहाय्याने गोळीबार केला. यात 11 जण ठार झाले. ठार झालेल्यांमध्ये सुरक्षा सैनिकांची संख्या मोठी आहे. हल्ल्याच्या वेळी इमारतीत नागरीकांची गर्दी फारशी नव्हती, असे सांगण्यात येते. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात जीवीतहानी टळली. सुरक्षा रक्षकांच्या गोळीबारात हे चार दहशतवादीही ठार झाले अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र याला सरकारी अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
दुसऱया एका वृत्तानुसार दहशतवाद्यांना इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळच रोखण्यात आले. सुरक्षा रक्षकांनी दहशतवाद्यांवर गोळीबार करून त्यांना पिटाळण्याचा प्रयत्न केला. मात्र दहशतवाद्यांनी हातगोळय़ांचा वर्षाव सुरक्षा रक्षक आणि इमारतीवर केला. या धुमश्चक्रीत 6 सुरक्षा सैनिकही ठार झाले. एका नागरीकाचा मृत्यू झाला. सुरक्षा रक्षकांनी नागरीकांना ओलीस ठेवण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न हाणून पाडला असा दावा करण्यात येत आहे. मात्र हल्ला नेमका कसा घडला याबद्दल विविध गटांकडून परस्परविरोधी विधाने करण्यात येत आहेत.
जबाबदारी स्वीकारली
बलुचिस्तान लिबरेशन आर्मी या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. गेल्या वर्षी ग्वादर येथे पर्ल काँटिनेंटल हॉटेलवरही हल्ला करण्यात आला होता. त्यात आठ जण ठार झाले होते. त्या हल्ल्याची जबाबदारीही याच संघटनेने स्वीकारली होती. या संघटनेच्या मजीद ब्रिगेड या शाखेने हे दोन्ही हल्ले केल्याचा प्रशासनाला संशय आहे. चौकशीतून सत्य बाहेर येईल असे संगण्यात आले.
एकाची ओळख पटली
चार दहशतवाद्यांपैकी सलमान याची ओळख पटली असून तो बलुचिस्तान प्रांताचाच रहिवासी असल्याची माहिती देण्यात आली. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी ही संघटना गेली 20 वर्षे कार्यरत आहे. अत्याचारी पाकिस्तानच्या तावडीतून बलुचिस्तान प्रांताला स्वातंत्र्य मिळवून देणे हे या संघटनेने ध्येय असल्याचे सांगण्यात येते. या संघटनेच्या किमान आठ शाखा आहेत.
इमारतीला वेढा
घटनेनंतर त्वरित पोलीसांनी कारवाई करत इमारतीला वेढा घातला. हा परिसर काही काळासाठी बंद करण्यात आला. लोकांना घराबाहेर न पडल्याचा इशारा देण्यात आला. सिंध प्रांताचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून दोषींना शासन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
तीन हल्ल्यांची मालिका
या हल्ल्यापूर्वी कराची आणि परिसरात तीन छोटे हल्ले करण्यात आले होते. ते कराची, घोटकी आणि लरकाना येथे घडविण्यात आले होते. या हल्ल्यांमध्ये चार नागरीक आणि दोन पाक सैनिक ठार तर बाराहून अधिक जखमी झाले होते. त्या हल्ल्यांचा संशयही बलुचिस्तान लिबरेशन आर्मीवरच घेतला जात आहे.
सिंध प्रांताला हादरा…
ड गेल्या दोन महिन्यांमधील सिंध प्रांतातील हा चवथा हल्ला
ड गेल्या वर्षभरातील पाकिस्तानातील हा सर्वात मोठा हल्ला
ड बलुचिस्तान प्रांतात पाक प्रशासनाविरोधात प्रचंड असंतोष
ड बलुचिस्तान लिबरेशन आर्मी संघटनेने स्वीकारली जबाबदारी
ड हल्लेखोरांना इमारतीत घुसू न दिल्याचा प्रशासनाचा दावा