कालेत सर्वाधिक 5353 तर हेळगावमध्ये 739 रूग्णांची नोंद
वार्ताहर /कराड
कराड तालुक्यात आजवर एकूण 35 हजार कोरोना बाधितांची नोंद झाली असून 32 हजार 637 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 691 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. विविध रूग्णालये, कोविड सेंटर व विलगीकरण कक्षात दीड हजार रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तालुक्यातील काले प्राथमिक आरोग्य केद्रांतर्गत गावात सर्वाधिक 5353 तर हेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावात सर्वात कमी 739 रूग्णांची नोंद झाली आहे. गत आठवडय़ापासून लॉकडाऊनमध्ये काही अंशी सवलत दिल्याने बाजारपेठेतील गर्दी वाढत असून त्याचा परिणाम रूग्णवाढीवर होत असल्याचे समोर येत आहे.
कोरोनासाठी सुरूवातीपासूनच हॉटस्पॉट ठरलेल्या कराड तालुक्यात अद्याप रूग्णवाढ सुरूच असल्याने बाधितांचा आकडा 35 हजाराच्या घरात गेला आहे. काही दिवसांपूर्वी लॉकडाऊनमध्ये शिथिलता देत अत्यावश्यक सेवेबाहेरील दुकाने उघडण्यासाठी 4 वाजेपर्यंत परवानगी दिल्याने बाजारपेठेतील गर्दी वाढली आहे. लोकांना परवानगी मिळाल्यानंतर कोरोनाच्या नियमांचा विसर पडल्याचेही पाहावयास मिळत आहे. रस्त्यावर व दुकानांत गर्दी होत आहे. बहुतांश लोक विनामास्क फिरताना दिसत आहेत. सोशल डिस्टन्सच्या नियमांचा फज्जा उडाल्याने तालुक्यातील रूग्णसंख्येतही वाढ होत असल्याचे दिसत आहे.
तालुक्यातील काले प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावात आजवर सर्वाधिक 5353 रूग्णांची नोंद झाली आहे. तर हेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात 739 रूग्णांची नोंद झाली आहे. वडगाव हवेली 3867, सदाशिवगड 4327, सुपने 2157, रेठरे 1964, इंदोली 1549, उंब्रज 2436, मसूर 2313, येवती 2011, कोळे 2076 व कराड शहरात 5864 रूग्णांची नोंद झाली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांत रूग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. 2 रोजी एकाच दिवशी तालुक्यात 11 रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. तर रोज सरासरी 4 ते 5 रूग्णांचे मृत्यू होत आहेत.
लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली असली तरी लोकांनी कोरोनाच्या अनुषंगाने लागू असलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. बाजारपेठेत गर्दी होत आहे. शासकीय कार्यालये व सार्वजनिक ठिकाणीही गर्दी होताना दिसत आहे. सध्या तालुक्यात लसीकरण मोहीम सुरू आहे. मात्र तेथेही सोशल डिस्टन्सचे पालन होत नाही. त्यामुळे नागरीकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.