चार महिन्यांनी जिल्हाधिकाऱयांची मंजुरी; दोन्ही आघाडय़ांच्या भूमिकेचा केला विचार
प्रतिनिधी/ कराड
सुमारे चार महिन्यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कराड नगरपालिकेच्या सन 2021-22 सालच्या बजेटला मंजुरी दिली आहे. त्यामुळे पालिकेचा कारभार गती घेण्याची शक्यता आहे. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी मांडलेली 134 कोटींची मुळ सूचना आणि जनशक्तीने बहुमताने मांडलेली 270 कोटींची उपसूचना याचा विचार करून 270 कोटींच्या बजेटला मंजुरी देण्यात आली आहे.
26 फेब्रुवारीला नगरपालिकेचे सन 2021-2022 सालचे बजेट मंजूर करण्यासाठी विशेष सभा झाली होती. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी 134 कोटींचे शिलकी अंदाजपत्रक मांडले होते. या अंदाजपत्रकात करवाढीचाही समावेश होता. मात्र स्थायीतील चर्चेनुसार बजेट सादर झालेले नाही, विकासकामांसाठी तरतूद नाही, असे सांगत जनशक्तीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव यांनी 270 कोटी रूपयांच्या बजेटची उपसूचना मांडत बहुमताने मंजूर केली होती. यात शहरातील विविध कामांचा समावेश असणारी उपसूचना त्यांनी मांडली होती. त्यास बहुमताने मंजुरी देण्यात आली होती.
शेवटी बजेट मंजुरीचा वाद जिल्हाधिकाऱयांच्या कोर्टात पोहोचला होता. मात्र जिल्हाधिकाऱयांनी दोन्ही आघाडय़ांच्या भूमिकेचा विचार करून 270 कोटींच्या बजेटला मंजुरी दिली आहे. मूळ सूचना व उपसूचना याचा विचार करून बजेट मंजूर करण्यात आले आहे.
अर्थसंकल्पीय सभा सत्ताधारी भाजप आणि जनशक्ती या दोन आघाडय़ांनी परस्पर विरोधी भूमिका घेतल्याने तर विरोधी लोकशाही आघाडीने संपूर्ण बजेटलाच आव्हान दिल्याने गाजली होती. शेवटी बजेटचा वाद जिल्हाधिकाऱयांकडे गेला. तेथेही लवकर निर्णय न झाल्याने राजेंद्रसिंह यादव यांनी उपोषण केले होते. त्यावेळी आश्वासन दिल्यानंतर जवळजवळ एक महिन्याने बजेटला मंजुरी मिळाली आहे. जिल्हाधिकाऱयांनी मालमत्ताकर व पाणीपट्टी कराची वसुली 100 टक्के करण्यासह जाहिरात कराचे फेरसर्वेक्षण करावे, विविध शासकीय योजना, अनुदाने याची 100 टक्के अंमलबजावणी करावी, अशी सूचना केली आहे.
अर्थसंकल्पीय सभेत नगराध्यक्षांनी सादर केलेल्या 134 कोटींच्या अंदाजपत्रकास जनशक्तीने विरोध करत 270 कोटींचे बजेट बहुमताने मंजूर केले होते. त्यावेळी नगराध्यक्षा आणि विनायक पावसकर यांनी, मूळ सूचनेसह उपसूचनेतील काही मुद्यांचा विचार करून बजेट मंजूर होईल, असे सांगितले होते. तर जनशक्तीने बहुमताने मंजूर झालेल्या उपसूचनेचे बजेट मंजूर होईल, अशी भूमिका घेतली होती. मात्र जिल्हाधिकाऱयांनी मूळ सूचनेसह उपसूचनेतील मुद्यांच्या आधारे बजेटला मंजुरी दिली आहे.
आता लक्ष लोकशाही आघाडीकडे
भाजप आणि जनशक्तीने सभेत मांडलेल्या बजेटला लोकशाही आघाडीने प्रखर विरोध केला होता. गटनेते सौरभ पाटील यांनी बजेट होपलेस असल्याचे सांगत त्यांनी उणीवा मांडल्या. त्यानंतर सत्ताधाऱयांचीच जुंपली होती. आता दोन्ही आघाडय़ांची भूमिका विचारात घेत बजेट मंजूर झाले आहे. आता या बजेटला विरोध करणाऱया लोकशाही आघाडीची भूमिका काय असणार, याची उत्सुकता आहे.