गाडी पार्किंग करण्यावरून वाद, हल्ल्यात युवक गंभीर जखमी
प्रतिनिधी/ कराड
कराडच्या जनता व्यासपीठ परिसरात भाजीमंडईत बुधवारी सायंकाळी जोरदार राडा झाला. गाडी पार्किंग करण्यावरून एकावर तलवारीने वार करण्यात आले. जमावाने केलेल्या हल्ल्यात आनिससाहब मेहबूब मसूरकर (वय 26, रा. कराड) हा युवक गंभीर जखमी झाला. त्याच्यावर वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, गजबजलेल्या मंडईत चिकन दुकानासमोर हा प्रकार घडल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला. मात्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अमित बाबर यांनी परिस्थिती हाताळत पोलीस बंदोबस्त वाढवला. याप्रकरणी रात्री उशिरा कराड शहर पोलिसात फिर्याद दाखल झाली.
पार्किंगवरून वादाची ठिणगी?
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कराडच्या भाजी मंडईतील जनता व्यासपीठाच्या बाजूला काही अंतरावर मंडईचे फिश मार्केट आहे. या मार्केटसमोर गाडी पार्क करण्याच्या कारणावरून युवकांच्यात किरकोळ वादावादी झाली. वादावादीचा हा प्रकार घडल्यानंतर किरकोळ तणाव झाला. त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास तलवारी घेतलेले युवकांचे टोळके मंडईत आल्याने पुन्हा तणाव वाढला. युवक आल्यानंतर मोठा जमावही त्या ठिकाणी आला. संतापलेल्या काही युवकांनी फिश मार्केटमधील एका दुकानात शिरत आनिससाहब मसूरकर याच्यावर तलवारीने हल्ला चढवला.
पोलिसांनी जमावाला पांगवले
अचानक झालेल्या हल्ल्यात आनिससाहब गंभीर जखमी झाला. मंडईत हल्ला झाल्याचे समजताच कराड शहर पोलिसांच्या गाडय़ा वेगाने घटनास्थळी दाखल झाल्या. पोलीस येईपर्यंत नागरिकांसह मसूरकरच्या नातेवाईकांनी त्याला तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात हलवले. याप्रकरणी मसूरकर याच्या नातेवाईकाने रात्री उशिरा फिर्याद दाखल केली. पोलिसांकडून घटनेची खोलवर चौकशी सुरू होती.
वाद नेमका काय?
हल्ल्याच्या घटनेनंतर मंडईसह उपजिल्हा रुग्णालयात जमाव एकत्र येऊ लागला. मात्र पोलिसांनी जमावाला पांगवत संशयितांचा शोध सुरू केला. रात्री पोलिसांनी घटनेशी संबंधित काही संशयितांना ताब्यात घेतले. हल्ल्याच्या प्रकाराचे नेमके कारण काय? याचा शोध पोलीस घेत होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी स्वतः या प्रकरणी चौकशी सुरू करत घटनास्थळ परिसरावर सातत्याने लक्ष ठेवले होते.