संक्रमणाच्या हॉटस्पॉटमध्ये मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार-पवार फिल्डवर, सोशल नव्हे कौटुंबिक डिस्टन्सही पाळलाय
देवदास मुळे / कराड
दक्षिण महाराष्ट्रात कोरोना बाधित रूग्णांची सर्वाधिक असणारे सांगली जिल्हय़ातील इस्लामपूर शहर हे संक्रमणाचा हॉट स्पॉट ठरले आहे. या शहरात कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी कराडच्या सूनबाई, इस्लामपूर पालिकेच्या मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार-पवार अहोरात्र रस्त्यावर उतरून काम करत आहेत. त्यांच्या धडाडीचे इस्लामपूरवासिय कौतुक करत आहेत.
प्रतिज्ञा पोतदार या मुळच्या नागपूर जिल्हय़ातील असून त्यांचे सासर कराड आहे. येथील दिवटे गल्लीतील अधिकराव पवार यांच्याशी त्यांचा विवाह 2008 मध्ये झाला. अधिकराव हे स्वतः अभियंता असून ते कन्स्ट्रक्शन व्यवसायात आहेत. कराडचे नगरसेवक हणमंत पवार हे त्यांचे नातेवाईक आहेत. प्रज्ञा पोतदार या बी. ई. सिव्हील असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत त्यांची निवड झाली. प्रारंभी त्यांनी ठाणे महानगरपालिकेत साहाय्यक आयुक्त, सांगोला व इचलकरंजी पालिकेत मुख्याधिकारी म्हणून काम केले आहे. सध्या त्या इस्लामपूर पालिकेत कार्यरत आहेत.
कोरोना आपत्तीत इस्लामपुरात 23 मार्चला चार रूग्ण कोरोना बाधित असल्याचे जिल्हाधिकाऱयांनी जाहीर केले. त्यावेळी मोठी खळबळ उडाली. इस्लामपूरची प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. यात शहराच्या सार्वजनिक आरोग्याची जबाबदारी असणारी नगरपालिका जोमाने कामाला लागली. मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार-पवार या रस्त्यावर उतरल्या. सोशल डिस्टन्स, बाधितांच्या संपर्कात आलेले लोकांपर्यंत पोहाचून त्यांना क्वारंटाईन करणे, शहरात गर्दी टाळणे, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नियमित व्हावा यासाठी प्रयत्नशील राहिल्या. दिवसभर फिल्डवर सक्रीय राहून बैठका, जिल्हा प्रशासनाशी समन्वय, स्वच्छता या कामात त्या व्यस्त होत्या. कोरोना बाधितांची संख्या वाढल्याने शहरात भीतीदायक वातावरण होते. त्यावेळी पब्लिक अनाऊंसमेंट सिस्टीम सुरू करून त्यांनी लोकांना आश्वस्त केले.
पोतदार यांना दोन लहान मुली आहेत. दिवसभर फिल्डवर काम केल्यानंतर संसर्गाच्या भीतीने घरी जाणेही टाळत कौटुंबिक डिस्टन्स ठेवला. दिवसभर काम केले तरी घरात थेट मुलींना न भेटता स्लॅबवरील स्वतंत्र खोलीत थांबत आहेत. घरात सासू, सासरे तसेच दोन लहान मुली व पती यांच्याशी सोशल डिस्टन्स ठेवून बातचित करून त्या पुन्हा कामावर रूजू होत आहेत. सुरूवातीला सकाळी सहापासून मध्यरात्रीपर्यंत त्या फिल्डवर काम करत होत्या.
धडाडीचे होतेय कौतुक
सध्या कोरोना विषाणूविरोधात जगभर लढाई सुरू आहे. या लढाईत सहभागी झालेल्या प्रज्ञा पोतदार यांनी महिला अधिकारी म्हणून काम करताना तितकीच धडाडी दाखवली आहे. या धडाडीचे सांगली जिल्हय़ातील लोकप्रतिनिधी व नगरविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱयांनीही कौतुक केले आहे.