प्रतिनिधी / कराड
विजयनगर येथे ताबा सुटलेल्या कंटेनरने समोरून आलेल्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने अपघातात एकजण जागीच ठार झाला. तर दुसरी व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे.
कराडकडून पाटणकडे भरधाव कंटेनर निघाला होता. विमानतळ परिसरात आल्यावर भरधाव कंटेनर दुभाजकावर आदळला. दुभाजकावर आदळतानाच समोरून आलेल्या दुचाकीस्वारांनाही कंटेनरने चिरडले. या भीषण अपघातात दुचाकीवरील एकजण जागीच ठार झाला. तर अन्य एकजण गंभीर जखमी झाला. कराडच्या वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचारी तत्काळ तिथे दाखल झाले. वाहतूक कर्मचारी यांनी कंटेनरचालकास ताब्यात घेतले. जखमीला उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल केले. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने अपघातग्रस्त कंटेनर हलवण्यासाठी प्रयत्न केले. कंटेनरच्या खाली ठार झालेल्या दुचाकीस्वाराचा मृतदेह अडकलेला होता. अपघातात मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम पोलिसांनी सुरू केले. रात्री उशीरा अपघाताची नोंद झाली होती.