कार्वे-कोरेगाव रस्त्यावर मृतदेह आढळला, पोलिसांचा वेगवान तपास; आज उकल होण्याची शक्यता
कराड प्रतिनिधी
कराड शहरासह तालुक्यात खुनांच्या घटनांची मालिका सुरूच असून सोमवारी तालुक्यातील कार्वे-कोरेगाव रोडवर निर्जनस्थळी रक्तबंबाळ अवस्थेत एका युवतीचा मृतदेह आढळून आला. उसाच्या शेताकडेला युवतीच्या डोक्यात दगड घालून तिला संपवत मारेकरी पसार झाल्याचे पोलीस तपासात समोर आले. 20 ते 25 वयोगटातील युवतीच्या डोक्यासह तोंडावरच जबर घाव घातल्याने मृताची ओळख पटवण्यात सोमवारी रात्रीपर्यंत पोलीस यंत्रणा गुंतल्या होत्या. मृतदेहाशेजारी सापडलेल्या एका पिशवीतील चिठ्ठीवरून पोलिसांना तपासाची निश्चित दिशा सापडल्याचे दिसत होते. यावरूनच पोलिसांनी वेगवान तपास करत या खून प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी यशस्वी सापळा रचला होता. त्यामुळे मंगळवारी या गुन्हय़ाची उकल होण्याची शक्यता दिसत होती.
दरम्यान जिल्हा पोलीसप्रमुख अजयकुमार बन्सल यांनी दुपारी घटनास्थळाची पाहणी करत वेगवेगळ्या पोलीस पथकांना तपासासाठी पाचारण केले होते. खून प्रकरणी पोलिसांच्यावतीने उपनिरीक्षक भरत तुकाराम पाटील यांनी कराड ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे.
ओळख न पटण्यासाठी चेहऱयावर घाव
सोमवारी कार्वे (ता. कराड) येथील भैरवनाथ मंदिर परिसरात कृष्णा नदीपात्रापासून काही अंतरावर रोडकडेलाच रक्तबंबाळ अवस्थेत युवतीचा मृतदेह स्थानिक ग्रामस्थांना दिसला. युवतीच्या डोक्यात खोलवर घाव घालून तिला संपवल्याचे स्पष्ट होत होते.
दरम्यान कार्वे येथील ग्रामस्थाने यांनी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात फोन करून घटनेची माहिती दिली. पोलीस उपअधीक्षक रणजीत पाटील, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, साहाय्यक निरीक्षक रेखा दूधभाते, उपनिरीक्षक भरत पाटील, उपनिरीक्षक भैरव कांबळे, हवालदार सज्जन जगताप, सागर बर्गे, फौजदार भोसले, महिला पोलीस खराडे अशी पोलिसांची टिम तात्काळ घटनास्थळी पोहोचली. घटनास्थळी पाहणी केली असता युवतीचा मृतदेह पडलेला होता. युवतीची उंची अंदाजे चार फूट एक इंच, अंगात लाल मोरपंखी रंगाचा वर्क केलेला टॉप, काळय़ा रंगाची लेगीज, गळयामध्ये पिवळ्या धातूची चैन असा पेहराव होता. हल्लेखोराने तिच्या डोक्यावर दगडाचे घाव घालत ओळख पटू नये, अशा पद्धतीने निर्घृणपणे खून केला होता.
तपास यंत्रणेला गुंगारा देण्यासाठी चिठ्ठी
खून केल्यानंतर मारेकरी एक पिशवी टाकून पसार झाला. त्याने जाताना टाकलेल्या पिशवीत एका महिलेच्या नावाचे आधारकार्ड व काही नावांचा उल्लेख करणारी चिठ्ठी ठेवली होती. त्यामध्ये युवतीच्या नावाचा उल्लेख करत आपल्या मृत्यूस अमूक-तमूक जबाबदार आहेत, असे लिहित काहींची नावेही दिली होती. पोलिसांनी चिठ्ठीच्या अनुषंगाने तपासाला सुरूवात केली मात्र तपास भरकटण्यासाठी हल्लेखोराने हा बनाव रचल्याचे पोलिसांनी जाणले. तरीही सर्व शक्यता गृहित धरून पोलिसांनी तपासासाठी आसपासच्या कार्वे, वडगाव हवेली, येरवळे या गावात दिवसभर चौकशी केली. तर घटनास्थळावर दोन देशी दारूच्या बाटल्या व ग्लास पडलेला होता.
रात्री उशिरा महत्त्वाचे धागेदोरे हाती
पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजीत पाटील यांनी या आव्हानात्मक गुह्याची उकल करण्यासाठी प्रत्येक पोलीस कर्मचारी व पथकाला वारंवार सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने मृतदेहाशेजारी सापडलेली चिठ्ठी, आधारकार्ड यावरून तपास करत चौकशीसाठी काहींना ताब्यात घेतले. या चौकशीतच पोलिसांना खुनाच्या गुह्याची उकल करणारे धागेदोरे हातात आले. त्या आधारे सोमवारी रात्री पोलिसांनी सापळा रचत मृताची ओळख पटवण्यासह हल्लेखोराच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रयत्न सुरू केले. रात्री उशिरापर्यंत हा आव्हानात्मक गुन्हा उघडकीस आणण्यासाठी कंबर कसली होती.
गुह्याची उकल करण्यासाठी सलग चौदा तास धावाधाव
युवतीचा खून ज्या पद्धतीने झाला होता, त्यानुसार हा गुन्हा उघडकीस आणण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. गुह्याची माहिती मिळाल्यापासून डीवायएसपी रणजीत पाटील, आनंदराव खोबरे यांच्यासह पोलीस यंत्रणा तपासात व्यस्त होती. शातीर हल्लेखोराने पोलिसांना गुंगारा देण्यासाठी रचलेला बनाव पोलिसांना तपासाची दिशा निश्चित करण्यासाठी मदतीला आला असावा. त्या अनुषंगाने बारीकसारीक गोष्टींवर लक्ष केंद्रित करत सोमवारी रात्रीपर्यंत पोलिस पथकांची तपासासाठी धावपळ सुरू होती. या धावपळीतूनच बारा तासांच्या आत गुन्हा उघडकीस येईल, अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र पोलिसांनी याबाबत अधिक माहिती देण्यास नकार देत तपासावर लक्ष केंद्रित केले होते.