प्रतिनिधी /सातारा
पुणे-बेंगळूर महामार्गावर साताऱ्यातील उंब्रजजवळ भीषण अपघात झाला. आज पहाटे ३.४५ च्या सुमारास चारचाकीवरील ताबा सुटल्याने पती-पत्नी जागीच ठार झाले. अमित आपाजी गावडे (वय ३८ ) आणि डॉ. अनुजा अमित गावडे (वय ३५) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेजण मुलांना घेऊन जाण्यासाठी पुण्याहून कोल्हापूरला येत होते. यावेळीच त्यांच्यावर काळाने घाला घातला.
कराड तालुक्यातील भोसलेवाडी येथे चालकाचा ताबा सुटून कार दुभाजकाला धडकली. त्यानंतर सातारा लेनवर कार पलटी झाली. अपघाताची माहिती मिळताच हायवे हेल्पलाईनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दस्तगीर आगा, अमित पवार, सलिम देसाई, रमेश खुणे व उंब्रज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर चालक गाडीमध्येच अडकला होता. त्यांनी कटावणीच्या सहाय्याने दार तोडून त्यांना बाहेर काढले. मात्र, दोघा पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. अपघातात कारचा चक्काचूर झाला होता.
मृत चंदगड तालुक्यातील निट्टूरचे जावई व लेक
साताऱ्यातील उंब्रज जवळ झालेल्या अपघातातील मृत अमित व अनुजा गावडे हे चंदगड तालुक्यातील निट्टूरला येत होते. अनुजा ही निट्टूरमधील सुभेदार शिवाजी पाटील यांची मुलगी आहे. तर अमित हे जावई आहेत. या दूर्दैवी अपघातात पती-पत्नींचा जीव गेल्याने पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त होत आहे.