पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल – दोन्ही खूनाचा छडा लावण्यात यश
प्रतिनिधी/ सातारा
कराडच्या वाखाण परिसरातील एका 35 वर्षीय मयत उज्वला ठाणेकर हिचा शनिवारी सकाळी धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना घडली. याच शनिवारी रात्री दहा वाजता कराड-पुसेसावळी रोडवर वाघेरी फाटय़ानजीक मयत रमेश पवार यांचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना घडली. या दोन्ही खूनाचा छडा लावण्यात कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलीसांना यश आले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱहाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत पाटील उपस्थित होते. अजयकुमार बंसल यांनी सांगितले की, मृत रमेश पवार हा फिरून भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होता. गावातीलच दीपक इंगळे याला रमेशचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा 10 ते 15 दिवसांपासून संशय आला होता. त्या करणावरून दोन दिवसांपूर्वी रमेश व दीपक यांच्यात किरकोळ वाद झाला होता. शनिवारी रमेश पवार हा गावातील लखन बालेखान मुलाणी याच्या बोलेरो पिकअपमधून भाजीपाला आणण्यासाठी कराडला गेला होता. चौघेजण रात्री दहाच्या सुमारास पुन्हा बोलेरो पिकअपने आर्वीकडे निघाले असताना कराड-पुसेसावळी रस्त्यावर वाघोरी फाटय़ापासून अंदाजे एक किलोमीटर अंतरावर पाठीमागून येणाऱया तवेरा गाडीने पिकअपला ओव्हरटेक केले.
तवेरा गाडीतून गावातील दीपक शहर इंगळे, संदीप सुभाष इंगळे व दोन अनोळखी व्यक्ती उतरल्या. दीपक व संदीप दोघेजण रमेशला गाडीतून खाली ओढत त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली दीपकने धारदार शस्त्राने रमेशवर वार केले. त्याचबरोबर संदीप व अन्य दोघांनी रमेश यास लाकडी दांडक्याने मारहाण केली. यात रमेशचा मृत्यू झाला होता.
सख्ख्या बहिणीचा बहिणीने व प्रियकराने केला खून
मृत उज्वला ठाणेकर ही पतीसमवेत राहत नव्हते. ती एकटी राहत होती. तिच्या घरी सचिन निगडे सतत येत असल्याने निगडे यांच्या पत्नीला म्हणजेच उज्वला हिच्या बहिणीला खटकत होते. तोच राग मनात धरून खून करण्यात आला. हा खून करण्यासाठी उज्वला यांची बहिण आरोपी ज्योती सचिन निगडे (वय 27) व सागर अरूण पवार (वय 28) यांनी परिसरात असणाऱया सीसीटीव्ही दिसू नये म्हणून घराच्या मागील बाजूने आता प्रवेश केला. त्यानंतर धारदार शस्त्राने वार करून उज्वला ठाणेकर याचा खून केल्याची कबुली संशयितांनी दिली असल्याचे बंसल यांनी सांगितले.