गोवारे येथील घटना, मित्राने खून केल्याचा निष्पन्न
प्रतिनिधी /कराड
कराड नगरपालिकेच्या घंटागाडीवर कॉन्ट्रक्ट बेसिसवर चालक म्हणून काम करणाऱया शहरातील बुधवार पेठेतील युवकाचा चौंडेश्वरीनगर गोवारे (ता. कराड) येथील मळी नावाच्या शिवारात गुप्तीसारख्या धारदार शस्त्राने वार करुन व डोक्यावर, कपाळावर दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना शुक्रवार 26 रोजी रात्री घडली. किरण मुकुंद लादे (वय 25, रा. बुधवार पेठ, कराड) असे मृताचे नाव आहे. दरम्यान, मृताच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीत किरणचा मित्र आकाश गवळी (रा. चौंडेश्वरीनगर, गोवारे) याच्यावर संशय व्यक्त केला असून पोलिसांकडून याबाबत तपास सुरु करण्यात आला आहे.
याबाबत मृत किरणचा भाऊ कुंदन मुकुंद लादे (वय 25) याने शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. कुंदन हा कराड नगरपालिकेच्या शववाहिकेवर चालक म्हणून काम करतो. तर त्याचा भाऊ किरण हा घंटागाडीवर कॉन्ट्रक्टर चव्हाण यांच्याकडे चालक म्हणून काम करतो. दोन्ही भाऊ एकत्र कुटुंबात राहतात. किरण हा सकाळी सकाळी साडेसहा ते सात वाजण्याच्या सुमारास दररोज घरातून घंटागाडीवर कामास जात होता. तो दुपारी जेवण करण्यास घरी आल्यानंतर जेवण करुन बाहेर चौकात जात असे. रात्रीच्या वेळी घरी उशिरा जेवण करण्यास येत होता. कधी कधी तो बाहेरच राहत होता व तेथूनच सकाळी कामावर जात होता.
किरण हा शुक्रवार 25 जून रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे घरातून घंटागाडीवर कामास गेला होता. त्यानंतर तो दुपारी घरी आला व जेवण करुन पुन्हा बाहेर गेला. तो रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही. त्यामुळे भाऊ कुंदन याची माझी पत्नी प्रज्ञा हिने किरणला फोन केला. त्यावेळी त्याचा मोबाईल फोन बंद होता. त्यानंतर आज शनिवारी सकाळी आठच्या सुमारास कुंदन हा कामावर असताना घंटागाडीचे मुकादम चव्हाण यांचा त्याला सकाळी साडेअकराच्या सुमारास फोन आला. त्यांनी ‘किरण कुठे आहे’, असे विचारुन ‘तू चौडेश्वरीनगर, गोवारे येथे ये’ असा निरोप दिला.
त्यामुळे कुंदन हा मित्र मृणाल थोरवडे याच्यासोबत चौडेंश्वरीनगर, गोवारे येथे गेला. त्यावेळी तेथील पुलाच्या पश्चिमेस ओढय़ाकडे जाणाऱया रोडवर मळी नावाच्या शिवारात जुबेर इनामदार यांच्या शेताजवळून जाणाऱया पाणंद रस्त्यावर एका युवकाचा मृतदेह पडला असल्याचे कुंदन याला समजले. त्यामुळे ते तेथे गेला असता तो मृतदेह भाऊ किरण लादे याचा असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. किरण याच्या कपाळात, डोक्यात मोठय़ा जखमा होऊन तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याच्या डाव्या डोळ्याच्या खाली व हातावर जखमा होत्या. त्याच्या डोक्याजवळ दगडाचे रक्ताने माखलेले दगडाचे तुकडे होते. त्याचे डाव्या पायाच्याजवळ गुप्तीसारखे धारदार शस्त्र पडले होते. दरम्यान, कुंदन लादे यास अशी माहिती मिळाली की, शुक्रवार, 25 रोजी रात्री साडेसातच्या सुमारास भाऊ किरण हा त्याचा मित्र आकाश गवळी याच्यासोबत गेला होता. त्यांच्यात वाद होऊन भांडण झाले. त्या भांडणाच्या कारणावरुन आकाश गवळी (रा. चौंडेश्वरीनगर, गोवारे, ता. कराड) याने चौंडेश्वरीनगर, गोवारे येथे मळी नावाच्या शिवारात किरणच्या डोक्यावर व कपाळावर दगडाने ठेचून व त्याच्यावर गुप्तीसारख्या हत्याराने वार करुन त्याचा निघृर्ण खून केला. तशी माहिती कुंदन याने पोलिसांना दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीतही आकाश गवळी याच्यावर किरणच्या खुनाचा संशय व्यक्त केला आहे.