कचरा संकलनासाठी गाडय़ांमध्ये पालिकेने बनवले सहा कप्पे, जागीच होणार वर्गीकरण
देवदास मुळे/ कराड
स्वच्छ सर्वेक्षणमध्ये सलग तिसऱया वर्षी देशातील अव्वल क्रमांक राखण्यासाठी येथील नगरपालिकेने जय्यत तयारी केली आहे. याचाच एक भाग म्हणून शहरात कचरा संकलन करणाऱया घंटागाडय़ांचे स्वच्छता रथ असे नामकरण करण्यात आले आहे. कचरा वर्गीकरणाचे चार कप्पे असणारी घंटागाडी देशात एकमेव असण्याचा पालिकेचा दावा होता. आता मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी घंटागाडीस आणखी दोन कप्पे वाढवण्याच्या सूचना केल्या असून घंटागाडीला आता सहा कप्पे करण्यात आले आहेत. त्यामुळे कचरा वर्गीकरण आता जागीच होणार आहे.
शहरात 18 घंटागाडय़ांच्या माध्यमातून कचरा संकलन करण्यात येते. प्रारंभी घंटागाडीस ओला, सुका व घरगुती वैद्यकीय घातक कचरा (सॅनिटरी वेस्ट) असे तीन कप्पे त्यात होते. तत्कालीन मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी घंटागाडीस चौथा प्लास्टीक कप्पा बसवण्याची सूचना केली होती. त्यानुसार चार कप्पे असणारी घंटागाडी देशात एकमेव असण्याचा दावा करण्यात आला होता. आता स्वच्छ सर्वेक्षणच्या चौथ्या वर्षाला सामोरे जाताना घंटागाडीचा लुक पुन्हा बदलण्यात आला आहे. मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी घरगुती घातक ई कचरा आणि रद्दी पेपर हे दोन कप्पे वाढवण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार हे दोन कप्पे वाढवून सहा कप्प्यांची गाडी कचरा संकलनासाठी सज्ज करण्यात आली आहे.
आता घंटागाडीत ओला कचरा, सुका कचरा, घरगुती घातक वैद्यकीय कचरा, प्लास्टीक कचरा, घरगुती घातक ई कचरा आणि रद्दी पेपर असे सहा कप्पे करण्यात आले आहेत. वैद्यकीय कचऱयात डायपर, सॅनिटरी नॅपकीन, कोविड 19 वेस्टअंतर्गत मास्क, पीपीई किट, हॅण्डगोव्हज यांचा समावेश आहे. घंटागाडीस सहा कप्पे करण्यात आल्याने नागरिक, महिलांकडून कचऱयाचे जागीच वर्गीकरण होणार आहे. त्यामुळे कचरा डेपोवरील कचरा वर्गीकरणाचा ताण कमी होणार आहे. घंटागाडीबरोबर असणारे कर्मचारी कचरा वेगवेगळा टाकण्यासाठी नागरिकांना मार्गदर्शन करत आहेत. घंटागाडय़ांचे आता स्वच्छता रथ असे नामकरण करण्यात आले आहे. घंटागाडय़ांची आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली आहे. स्वच्छतेबाबत जनजागृती होण्यावर भर देण्यात आला आहे. प्रबोधन करणारे फलक गाडीवर लावण्यात आले आहेत. त्यात वेगवेगळय़ा प्रकारच्या कचऱयाची माहिती देण्यात आली आहे.