प्रतिनिधी / कराड :
कराड येथील बुधवार पेठ येथे असलेल्या कृष्णा नाका परिसरात वाघ व बिबट्याच्या नखांची विक्री करणाऱ्या दोघांना वनविभागाकडून अटक करण्यात आली आहे.
दिनेश बाबूलालजी रावल (वय 38 रा.सोमवार पेठ कराड) व अनुप अरुण रेवणकर (वय 36 रा.रविवार पेठ कराड) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
गेल्या काही दिवसांपासून वनविभाग व वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरोचे अधिकारी हे संशयितांवर पाळत ठेऊन होते. काल सोमवार 16 ऑगस्ट रोजी संशयित हे वाघ व बिबट्याच्या नखांची विक्री करण्याच्या तयारीत होते. गुप्त माहिती वरून कृष्णा नाका कराड येथे सावित्री कॉर्नर बिल्डिंगमध्ये असलेल्या सखी लेडीज शॉपी येथे संशयित दिनेश रावल हा दोन वाघनख्या घेऊन विक्रीसाठी आला. त्यावेळेस वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला झडप घालून पकडले. त्याला ताब्यात घेऊन लगेचच दुसऱ्या संशयित अनुप अरुण रेवणकर याच्या रविवार पेठ येथील काझी वाड्याजवळ असलेल्या मयूर गोल्ड या दुकानात धाड टाकल्यावर त्याच्या जवळ 8 वाघ/ बिबट्याच्या नख्या सापडल्या. तसेच आरोपीच्या गळ्यात एक वाघ नख सापडले. असे एकूण 13 नख सापडले. दोघांनाही वनविभागाने अटक करून गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, यामागे आंतरराज्य टोळी सहभागी असल्याचा संशय वनविभागाने व्यक्त केला आहे.