प्रतिनिधी/ कराड
निसर्ग चक्रीवादळामुळे कराड शहर व तालुक्यात बुधवारी सकाळपासून वादळी वाऱयासह जोरदार पाऊस झाल्याने भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते. मात्र वादळाचा जोर न वाढल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.
बुधवारी सकाळपासून शहरात मुसळधार पाऊस सुरू होता. त्यातच वादळी वारेही वाहत असल्याने नागरिकांची तारांबळ उडत होती. पावसामुळे सकाळपासून वीज पुरवठा खंडित झाला होता. ही वीज सकाळी 11.30 पासून पुर्ववत झाली. जोरदार पावसामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. पावसाच्या सरी दिवसभरात कमी जास्त होत होत्या. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर बाजारपेठेत गर्दी वाढत आहे. आज पाऊस असतानाही बाजारपेठेत गर्दी होती.
वादळी पावसाच्या पार्श्वभूमीवर कराड नगरपालिकेने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले होते. कच्च्या घरांत न थांबण्याचेही आवाहन केले होते. महावितरण विभाग, महसूल विभागही अलर्ट होता. मात्र अपवाद वगळता नुकसानीच्या घटना घडल्या नाहीत. शहरात जाहिरात फलकांचे वाऱयामुळे नुकसान झाले.
मलकापूर, आगाशिवनगरलाही पडझड
मलकापूर शहरासह परिसरात बुधवारी वादळी वारयासह पावसाने जनजीवन पुरते विस्कळीत झाले. आगाशिवनगर परिसरात घरांची किरकोळ पडझड झाली. मलकापूर, आगाशिवनगर, चचेगाव, कापिल, गोळेश्वर परिसरात मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. आगाशिवनगरला इमर्सन कंपनी, झेडपी कॉलनी परिसरात रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनधारकांची कसरत सुरू होती. आगाशिवनगर झोपडपट्टी परिसरात संरक्षक भिंतीमुळे अनेक घरांची गैरसोय दूर झाली मात्र 13 घरांमधे पाणी घुसले होते. ढेबेवाडी फाटा, कोल्हापूर नाक्यावर दुकानांचे डिजीटल जाहीरात फलक वाऱयाने उडून गेले. उडालेले फलक मोडतोड होऊन रस्त्यावरच पडलेले होते. कोल्हापूर नाक्यावर पाणीच पाणी साचले होते. आय लव्ह कराडच्या सेल्फी पॉईंटसमोरील रस्ता पाण्यातच होता. मलकापूर येथील मार्केटयार्ड रस्त्याचीही दुर्दशा झाली.
मास्क सांभाळायचा की पावसातून सावरायचे
कोरोनाच्या संकटकाळातच निसर्ग वादळाचेही संकट घोंगावू लागल्याने नागरिकांची कुचंबणा झाल्याचे दिसत होते. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी मास्क घातलेले होते. मात्र मुसळधार पावसात मास्क भिजून अडचण निर्माण झालेली दिसत होती. अनेक वाहनधारकांना भिजलेलेच मास्क तोंडावर ठेवून कसेबसे पावसातून सावरावे लागत होते.