रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह 10 जणांना अटक; दरोडय़ाच्या तयारीत असताना एलसीबीची कारवाई
प्रतिनिधी/ कराड
कराड परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सोमवारी रात्री जेरबंद केले. या टोळीकडून देशी बनावटीची 14 पिस्टल तसेच 20 जिवंत काडतुसे असा सुमारे नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली. या टोळीमध्ये कराड परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा समावेश आहे. या टोळीकडून आणखी गुन्हे उघडकीस येतील, अशी शक्यता पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी वर्तवली आहे.
या प्रकरणी संशयित सनी उर्फ गणेश शिंदे (रा. ओगलेवाडी, ता. कराड), अमित हणमंत कदम (रा. अंतवडी, ता. कराड), अखिलेश सूरज नलवडे (रा. गजानन हौसिंग सोसायटी कराड), धनंजय मारुती वाटकर (रा. सैदापूर कराड), वाहिद बाबासाहेब मुल्ला (रा. विंग, ता. कराड), रिजवान रज्जाक नदाफ (रा. मलकापूर), चेतन शाम देवकुळे (रा. बुधवार पेठ, महात्मा फुलेनगर कराड), बजरंग सुरेश माने (रा. बुधवार पेठ कराड), हर्ष अनिल चंदवाणी (रा. मलकापूर), तुषार पांडूरंग शिखरे (रा. हजारमाची कराड) या दहा संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, इतक्या मोठय़ा प्रमाणात पिस्टल जप्त झाल्याने शहर व परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर अधीक्षक बापू बांगर यांनी सातारा जिल्हय़ातील बेकायदा ग्नशस्त्रs बाळगणाऱया लोकांची माहिती इसमांची माहिती काढून कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची पथके तयार करुन त्यांना कारवाया करण्याचे आदेश दिले होते.
28 मार्च रोजी उपअधीक्षक अजय कोकाटे, पोलीस निरीक्षक अरुण देवकर व स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे कराड शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबवित असताना पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना राजमाची (ता. कराड) गावच्या हद्दीत कराड ते विटा रोडवर जानाई-मळाई मंदिराजवळ रस्त्याच्या बाजूला उसाच्या शेताच्या जवळ काही इसम जमले असून ते दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती मिळाली. देवकर यांनी पथकास याबाबत माहिती देऊन सर्व अधिकारी व पोलीस अंमलदार पंचांसह रवाना झाले. राजमाची येथे संबंधित ठिकाणी उसाच्या शेतालगत आडोशास सुमारे 8 ते 10 इसम उभे असल्याचे दिसले. त्यांना पथकाची चाहुल लागताच ते पळून जाण्याचा प्रयत्नात असताना पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या कब्जातून 9 लाख 11 हजार 900 रुपये किमतीच्या 14 देशी बनावटीच्या पिस्टल व 22 जिवंत काडतुसे, मिरची पुड, कोयता असा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्या विरुध्द कराड शहर पोलीस ठाण्यास दरोडा टाकण्याच्या पूर्वतयारीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अधीक्षक समीर शेख, अपर अधीक्षक बापू बांगर, उप अधीक्षक रणजित पाटील यांच्या सूचनाप्रमाणे व अजय कोकाटे परि. पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक भगवानराव पाटील, पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, संतोष पवार, रवींद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, विश्वास शिंगाडे, उदय दळवी, अंमलदार उत्तम दबडे, तानाजी माने, अतिष घाडगे, संतोष पवार, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष सपकाळ, शरद बेबले, साबीर मुल्ला, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, अमोल माने, गुनीर गुल्ला, शिवाजी सचिन भिसे, निलेश काटकर, मोहन पवार, प्रवीण कांबळे, गणेश कापरे, रोहित निकम, विशाल पवार, ससाणे, मयुर देशमुख, मोहसीन मोमीन, धीरज महाडीक, पृथ्वीराज जाधव, प्रवीण पवार, वैभव सावंत, गणेश कापरे, संभाजी साळुंखे, पंकज बेसके, येळवे, कुलदीप कोळी, अमित वाघमारे, सज्जन जगताप, सचिन निकम, सागर बर्गे यांनी सदरची कारवाई केलेली आहे.
गुन्हय़ाची व्यापी वाढण्याची शक्यता
स्थानिक गुन्हे अन्वेषणने अतिशय वेगाने ही कारवाई करत 14 पिस्टल जप्त केली आहेत. यात रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा समावेश आहे. त्यांच्याकडे आणखी कसून तपास करण्यात येणार आहे. या टोळीकडून आणखी गुन्हे उघडकीस येतील, अशी शक्यता पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी वर्तवली. दरम्यान, या प्रकरणी अनेकांना बोलावून पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे या गुन्हय़ाची व्याप्ती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पिस्टल साठा मोठय़ा प्रमाणात जप्त झालेली महाराष्ट्रातील पहिली कारवाई
जिल्हय़ातील शस्त्र गुन्हे वाढल्याने पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी जिल्हय़ात बेकायदा अग्निशस्त्रs बाळगणारांवर कारवाई करण्याच्या सूचना एलसीबीला दिल्या होत्या. एलसीबीने यापूर्वी अशी शस्त्रs वापरणारांवर कारवाई केली असली तरी एका वेळी एक किंवा दोन पिस्टल, गावठी कट्टे सापडत होते. तथापि या कारवाईत तब्बल 14 पिस्टल हस्तगत करण्यात आली आहेत. महाराष्ट्रात शस्त्र साठा हस्तगत करण्याच्या कारवाया पोलीस दलाने केल्या आहेत. मात्र इतका मोठा पिस्टल साठा एकाच कारवाईत हस्तगत करण्याची ही महाराष्ट्रातील पहिली कारवाई आहे. या धडाकेबाज कामगिरीची नोंद पोलीस अधीक्षक समीर शेख आणि सातारा पोलीस दलाच्या नावावर झाली आहे.